पुण्यात हरवलेले पाकीट सापडले पंढरपुरातील विठ्ठलाच्या हुंडी पेटीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 02:48 PM2019-11-19T14:48:16+5:302019-11-19T14:50:37+5:30
तीन महिन्यांपूर्वीची घटना; पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात आली उघडकीस
पंढरपूर : तीन महिन्यांपूर्वी पुणे येथे पाकीट हरवले; मात्र याबाबत मी कोणाकडेही तक्रार केली नव्हती. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या हुंडी पेटीत सापडले. पुन्हा हे पाकीट मिळाल्याने आनंद झाला, असे रघुनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.
रघुनाथ पुरुषोत्तम कुलकर्णी (रा. औरंगाबाद, सध्या कोथरुड, पुणे) यांचा मुलगा पुणे येथे राहतो. त्यामुळे ते मुलाकडे राहण्यासाठी आले होते. तीन महिन्यापूर्वी त्यांचे पाकीट कोथरुड येथे हरवले होते. त्यामध्ये २ हजार ४१० रुपये, पॅनकार्ड, आधारकार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती. तसेच मुलाला देखील सांगितले नव्हते.
पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील हुंडीपेटीतील दान मोजताना त्यांचे पाकीट आढळून आले. मंदिरातील कर्मचारी संभाजी देवकर, तुकाराम कुलकर्णी, विशाल देवकते, मिलिंद माने यांनी संबंधित कागदपत्राच्या आधारे रघुनाथ कुलकर्णी यांचा मोबाईल नंबर शोधून काढला. त्यांच्याशी संपर्क साधून पाकीट व त्याच्यातील वस्तू घेऊन जाण्यास सांगितले, असे मंदिर समितीचे लेखापाल सुरेश कदम यांनी सांगितले.
विठ्ठल गाभाºयात सापडली पैसे असलेली पिशवी
- श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सुरक्षा कर्मचारी नामदेव शीलवंत हे सोमवारी विठ्ठल गाभारा येथे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांना दर्शन रांगेमध्ये ९ हजार १३० रुपयांसह पिशवी सापडली. ती पिशवी पुणे येथील भाविक रत्नमाला सतीश जाधव (वय ६४) यांची असल्याची खात्री करुन त्यांना परत देण्यात आल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
अनेक भाविक मंदिरात वस्तू, पैसे विसरतात. त्या वस्तू सापडल्यास मंदिर समितीचे कर्मचारी त्यांना नि:स्वार्थीपणाने परत करतात. त्याच पद्धतीने मंदिराच्या हुंडीपेटीत एक पाकीट सापडले होते. त्याबाबत संबंधित व्यक्तीला संपर्क साधून ते घेऊन जाण्यास सांगितले आहे.
- बालाजी पुदलवाड,
व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती
माझे पाकीट पुणे येथील कोथरुडमध्ये हरवले होते. ते विठ्ठलाच्या हुंडीपेटीत सापडले हा देवाचा महिमाच समजावा लागेल. याबाबत मला मंदिर समिती कर्मचाºयांकडून संपर्क करण्यात आला आहे.
- रघुनाथ कुलकर्णी,
पुणे