लोटांगणाची जत्रा! दक्षिण कोकणातील प्रतिपंढरपूर, सोनूर्लीचा जत्रोत्सव ठरतोय आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 02:17 PM2017-11-06T14:17:02+5:302017-11-06T14:21:40+5:30
दक्षिण कोकणात म्हणजे महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वार्षिक जत्रोत्सवांना त्रिपुरारी पौर्णिमेपासून प्रारंभ झाला आहे.
सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणात म्हणजे महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वार्षिक जत्रोत्सवांना त्रिपुरारी पौर्णिमेपासून प्रारंभ झाला आहे. आता आगामी तिन महिन्यात गावोगावी ग्रामदेवतांचे उत्सव भावनिक आणि अध्यात्मिक वातावरणात साजरे केले जाणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील सोनूर्ली गावचा माऊलीचा जत्रोत्सव रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. ही जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे.
नवसाला पावणाऱ्या देवी माऊलीची ख्याती जगभर पसरली आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी दर्शनाला आणि लोटांगण घालून नवस फेडायला भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून हजेरी लावतात. सकाळपासून भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी गर्दी करतात. दिवसभर हा कार्यक्रम चालतो.
अशी घालतात लोटांगणे
ज्या भाविक भक्तांचे नवस पूर्ण होतात त्यांना जत्रोत्सवाच्या दिवशी कडक उपवास धरायचा असतो. रात्री साधारणपणे ११.३० नंतर मंदिराच्या समोरील पायरीपासून पुरुषांच्या उघड्या अंगाने लोटांगणाला सुरुवात होते. संपूर्ण मंदिराच्या सभोवताली फिरून पुन्हा त्याच पायरीकडे आल्यावर लोटांगण पूर्ण होते. त्यानंतर मंदिराच्या नजिकच्या विहिरीवर स्नान करून नारळाच्या शहाळ्याचे पाणी पिऊन उपवास सोडला जातो आणि लोटांगणाचा नवस फेडला जातो.
महिलाही नवस फेडतात-
पुरुषांप्रमाणे महिलाही नवस फेडतात. महिला मंदिराच्या भोवताली उभ्याने केस सोडून फेरी मारत लोटांगण पूर्ण करून नवस फेडतात. यासाठी महिलांची मोठी गर्दी असते. मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही. हे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
ग्रामस्थांचे सुयोग्य नियोजन-
या जत्रोत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविक सोनूर्ली गावात येतात. यासाठी ग्रामस्थ, देवस्थान कमिटीचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी, एस.टी, पोलीस हे अगोदर बैठका घेऊन नियोजन करतात. लोटांगणाच्यावेळी रात्री ११ नंतर प्रचंड गर्दी उसळते. मात्र सुयोग्य नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडत नाही.