भाजपात येण्यासाठी अजून खूप लोक रांगेत आहेत, मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 12:12 PM2018-05-24T12:12:06+5:302018-05-24T12:12:06+5:30
राष्ट्रवादीचे नेते निरंजन डावखरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
मुंबई- राष्ट्रवादीचे नेते निरंजन डावखरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली. अजून खूप लोक रांगेत आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. समाजातील विविध क्षेत्रांतील चांगल्या लोकांना भाजपात काम करण्याची संधी मिळते. एक चांगला कार्यकर्ता म्हणून निरंजन डावखरेंना भाजपामध्ये प्रवेश दिलाय.
निरंजन डावखरे यांचं भाजपामध्ये स्वागत करतो. ते पुन्हा एकदा कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून येतील, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. अजून खूप लोक रांगेत आहेत. आताच काही सांगणार नाही, पण वेळ आल्यावर तुम्हाला कळेल, असं देवेंद्र फडणवीस उपस्थित पत्रकारांना उद्देशून म्हणाले आहेत. विशेष म्हणजे निरंजन डावखरे यांना भाजपा कार्यालयापर्यंत आज राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील सोडायला आले होते. त्यामुळे निरंजन डावखरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
पेट्रोल आणि डिझेलवर करावर कर असल्यानं किंमत वाढली आहे. आम्ही कर आधीच कमी केले आहेत, पण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने इंधनाच्या किमतीत वाढ झाली आहे. इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न सुरू आहे, ज्यामुळे त्याची किंमत कमी होईल, असंही फडणवीस म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही स्तुतिसुमनं उधळली आहेत. केंद्रानं मुंबईच्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली. केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील सिंचनासाठी भरघोस निधी दिला आहे.
We have decreased our taxes already but now rates are going up due to rising crude oil prices in international market. So we are trying to make a consensus in GST Council on bringing petroleum under GST, that will decrease the price: Maharashtra CM Devendra Fadnavis (file pic) pic.twitter.com/7aA1LkQjJW
— ANI (@ANI) May 24, 2018
आतापर्यंत राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपा प्रवेश
राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वी पक्षाची साथ सोडून भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. नंदुरबारमधील वजनदार नेते आणि माजी मंत्री विजय कुमार गावित यांनी भाजपात प्रवेश करीत विधानसभा निवडणूक लढवली, ते मोठ्या मतांनी विजयी झाले. त्यानंतर त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची कन्या हिना गावित यांनी भाजपाकडून निवडणूक लढवून लोकसभेत जाण्याचा मार्ग पत्करला.
भिवंडीतील राष्ट्रवादीचे नेते कपिल पाटील यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भिवंडीमधून लोकसभा निवडणूक लढविली. सांगलीतील राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद सदस्य संजय काका पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश करून निवडणूक लढवली. आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रिपद भूषविलेले संजय सावकारे यांनीही राष्ट्रवादीला धक्का देत भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. बीडचे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री सुरेश धस, विनायक मेटे, मुरबाडचे नेते किसन कथोरे, मंदा म्हात्रे, भारती लव्हेकर आणि आजच ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते निरंजन डावखरे यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देत भाजपात दाखल झाले आहेत.