घोटभर पाण्यासाठी चिमुकल्यांची कोसभर धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 10:51 AM2019-05-09T10:51:46+5:302019-05-09T10:54:14+5:30
पाणी रे पाणी... खोल-खोल विहिरीत जीव धोक्यात : बंकलगी येथील वधू-वरांचा विवाह होतोय चक्क सोलापुरात
राजकुमार सारोळे
सोलापूर : जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणावर बसू लागल्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी येथे यंदा पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे. गावात पाण्याची सोय नसल्याने यंदा एकही लग्न झाले नाही. दरवर्षी गावातील शाळेत दहा ते पंधरा लग्ने होतात. लग्नासाठी आता सोलापूर शहराकडे धाव घ्यावी लागत आहे.
बंकलगी गावात सोमवारी दुपारी पावणेदोन वाजता प्रवेश केला. चौकातच दोन मुले सायकलवरून गावाकडे पाणी नेत होती. कुठून पाणी आणताय, असे विचारल्यावर ती मुले म्हणाली, आमच्या गावात पाणी नाही, शेजारच्या म्हणजे आहेरवाडी गावातून पाणी आणावे लागतेय. सरकारी टँकर येतो का, असे विचारल्यावर मुले म्हणाली, कधीतरी येतो, पण खासगी टँकरवाले एक बॅरेल भरून द्यायला शंभर ते दोनशे रुपये मागतात, त्यापेक्षा आम्हीच सायकलवरून पाणी आणतो. शहराजवळच्या गावाची ही आहे वस्तुस्थिती.
ग्रामीण भागातील दुष्काळाच्या झळा कशा आहेत, हे पाहणी करण्यासाठी दौरा केला. आहेरवाडीनंतर एक कोसवर बंकलगी गाव लागले. चौकात पाण्याच्या टाकीशेजारीच बोअरवर घागरींची रांग दिसली, पण जवळ कोणीच दिसत नव्हतं. उत्सुकता वाटली म्हणून जवळ गेलो तर बाजूच्या पत्राशेडमध्ये महिलांचा गोेंधळ ऐकू आला. काय चाललं आहे म्हणून तेथे गेल्यावर महिलांचा गजग्याचा डाव रंगलेला.
आम्ही गेल्यावर धावतच त्या महिला बोअरवर पोहोचल्या आणि चालू कर रे मोटार, अशी पोराला आॅर्डर दिली. मोटार सुरू झाल्यावर चार-पाच घागरी पाणी आले आणि जोराचा फुसकारा मारून पंप बंद पडला. ज्यांना पाणी मिळालं त्या महिला घागरी घेऊन आनंदात आपल्या घराकडे निघून गेल्या आणि इतर महिला तोंड वेडेवाकडे करीत पुन्हा शेडमध्ये परतल्या. हा काय प्रकार आहे म्हणून चौकशी केल्यावर पाणीटंचाईची वस्तुस्थिती समोर आली.
लक्ष्मीपुत्र बिराजदार म्हणाले, इथे ९६ प्लॉट झोपडपट्टी आहे. गावात फक्त तीनच ठिकाणी पाणी मिळते. या झोपडपट्टीत मल्लिकार्जुन भालगाव यांनी मारलेल्या बोअरमधून दर तासाला आठ ते दहा घागरी पाणी मिळते. यासाठी परिसरातील महिला सकाळपासूनच रांगा लावतात. घागरभर पाण्यासाठी महिलांची भांडणे होतात.
निर्मला देशमुख म्हणाल्या आंघोळ व सांडपाण्यासाठी मिळत नाही. शांताबाई ढाले म्हणाल्या, पाण्याच्या रांगेसाठी घरातील एक माणूस नेमला आहे. द्रौपदी वाघमारे म्हणाल्या, बोअरवर पाणी नाही मिळाले तर खासगी टँकरवाल्याकडून पाणी विकत घ्यावे लागते.
दोन वर्षांपासून योजना बंद
- शरण्णप्पा मोटे म्हणाले, गावची पाणीपुरवठा योजना दोन वर्षांपासून बंद आहे. ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्यासाठी तीन विहिरी घेतल्या, पण त्या कोरड्या आहेत. त्यामुळे एकतर आहेरवाडी किंवा सुलेरजवळगे येथील हापशावरून पाणी आणावे लागते असे सांगितले. येथून गावाकडे जात असतानाच बाजूच्या शेतातून काही जण पाणी आणताना दिसले. तेथे गेल्यावर ७५ फूट खोल विहिरीत पाण्याचा छोटा डोह दिसला. यातून घागरी भरून फूटभर दगडी कपारी चढून पाणी काढण्यात येत असल्याचे दिसून आले. रेवप्पा कोरे पायºया चढून वर आल्यावर त्यांना दम लागला होता. पाणी गढूळ होते तरीही गाळून प्यावे लागते, असे त्यांनी सांगितले.
गावात पाणी नसल्याने लग्ने होत आहेत शहरात
- बंकलगी गावात ग्रामपंचायतशेजारी असलेल्या जुन्या आडातून लोकांना पाण्याची सोय करण्यात आली आहे. हा आड आटला आहे. तक्रार केल्यावर रविवारी तीन टँकर पाणी ओतण्यात आले आहे, अशी माहिती रेवप्पा कोरे यांनी दिली. जुन्यात आडात पाणी ओतल्याने घाण झाले आहे, तरीही वापरण्यासाठी लोक पाणी शेंदून नेत आहेत. पाणी टंचाईने लोक हैराण झाले आहेत. एनटीपीसी परिसरात तलावामुळे सुटलेल्या पाझरवर बोअर मारून काही लोक टँकरने पाणी आणून विकत आहेत. गावात पाण्याची सोय नसल्याने यंदा एकही लग्न झाले नाही. दरवर्षी गावातील शाळेत दहा ते पंधरा लग्ने होतात. पाणीटंचाईमुळे सुतार यांनी सोलापुरात मुलाचे लग्नकार्य उरकल्याचे कोरे यांनी सांगितले. आता ज्यांच्या घरात कार्य ठेवले आहे, त्यांनासुद्धा शहर गाठण्याची पाळी आली आहे.
बंकलगीवर एक नजर
- - सोलापूरपासून २५ किमी अंतर
- - बाजूची गावे आहेरवाडी, सुलेरजवळगे
- - पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट
- - शाळकरी मुले, महिलांना फिरावे लागते पाण्यासाठी
- - शेतकºयांच्या लिंबू, डाळिंब, द्राक्षबागा वाळल्या
- - बागा जगविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू
- - एकाच बोअरला पाणी असल्याने गर्दी
- - नाईलाज म्हणून घ्यावे लागते विकतचे पाणी
- - बॅरलला ५0 ते १00 रुपये पाण्याचा दर