महापालिकांच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; नवी मुंबईत सर्वाधिक सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 06:04 AM2022-02-16T06:04:38+5:302022-02-16T06:05:24+5:30
नवी मुंबई पहिल्या, ठाणे दुसऱ्या तर केडीएमसी तिसऱ्या नंबरवर
ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ठाणे महापालिका हरकती-सूचनांमध्ये दोन नंबरवर असल्याचे दिसत आहे. नवी मुंबई महापालिकेत तब्बल तीन हजार ८५२ हरकती, सूचना प्राप्त झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर ठाणे महापालिकेत एक हजार ९६२ हरकती सूचना आल्या आहेत. सोमवारी शेवटच्या दिवशी ठाण्यात अक्षरश: हरकती आणि सूचनांचा धो धो पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ५७८ हरकती - सूचना एकट्या नौपाडा-कोपरी या प्रभाग समितीतून आल्या आहेत.
ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यातील ठाणे, उल्हासनगर, कल्याण - डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई विरार या महापालिकांमध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहे, तर या महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागरचना नुकत्याच जाहीर झाल्या होत्या. त्या जाहीर झालेल्या प्रभागरचनेबाबत हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. जिल्ह्यातील नवी मुंबईमध्ये सर्वाधिक ३८५२ हरकती-सूचना प्राप्त झाल्या असून, त्या पाठोपाठ ठाणे १९६२, केडीएमसी ९९७, उल्हासनगर ३९४ हरकती व सूचना प्राप्त झाल्या.
छाननी करून वर्गीकरण
ठाणे महापालिकेत प्राप्त झालेल्या हरकती - सूचनांची त्या त्या स्वरूपानुसार छाननी करून त्यांचे वर्गीकरण केले जात आहे. तसेच एकाच दिवशी म्हणजे येत्या २६ फेब्रुवारी रोजी हरकती - सूचना प्रभाग समितीनिहाय त्या त्या ठिकाणी मार्गी लावल्या जातील. तसेच आलेल्या हरकती- सूचनांची माहिती बुधवारी संध्याकाळपर्यंत निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार असल्याने ते काम सुरू आहे. त्या सर्वांची माहिती टाइप करून सादर करायची असल्याने त्या कामासाठी १५ ते १६ टायपिस्टद्वारे काम सुरू असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.