सिडकोच्या घरांची सोडत गणपतीत, की दिवाळीत?; मुहूर्तासाठी पुढच्या आठवड्यात बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:58 AM2022-07-08T07:58:43+5:302022-07-08T07:58:58+5:30
सध्या निर्मितीच्या प्रक्रियेत असलेल्या ३५ हजार घरांना महारेराची मंजुरी मिळाली आहे. त्यांच्या मार्केटिंग आणि विक्रीसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे.
नवी मुंबई : पंतपप्रधान आवस योजनेअंतर्गत सिडकोच्या प्रस्तावित ३५ हजार घरांना महारेराची मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात यापैकी पाच हजार घरांची सोडत काढण्याची योजना सिडकोने तयार केली आहे परंतु, ती गणपतीत काढायची की दिवाळीत याबाबत सिडकोच्या संबंधित विभागात संभ्रम आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी हे पुढच्या आठवड्यात आढावा बैठक घेणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेंतर्गत सिडकोने विविध घटकांसाठी घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील चार वर्षांत ६७ हजारे बांधण्यात येणार आहेत. त्यांचा आराखडा तयार करून बांधकामासाठी कंत्राटदारही नेमले आहेत. त्यापैकींचे बांधकाम सुरू झाले आहे. विशेषतः कामोठे, जुईनगर रेल्वेस्थानक परिसरात कोर्ट एरिया तसेच वाशी येथील ट्रक टर्मिनलच्या जागेवर ती बांधली जात आहेत.
सध्या निर्मितीच्या प्रक्रियेत असलेल्या ३५ हजार घरांना महारेराची मंजुरी मिळाली आहे. त्यांच्या मार्केटिंग आणि विक्रीसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. ३५ हजार घरांपैकी टप्प्याने सोडत काढण्याची सिडकोची योजना आहे. त्यातील पाच हजार घरांची गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सोडत काढण्याची योजना होती. परंतु, विविध कारणांमुळे हा बेत रद्द झाल्याचे बोलले जात आहे. गणपती की दिवाळी याबाबतचा संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीने सिडकोने पावले उचलली आहेत.
सत्तांतराचा फटका
पाच हजार घरांची गणपतीत सोडत काढण्याचे सिडकोने निश्चित केले होते शिवाय त्यावेळचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यास अनुमती दिली होती. परंतु, आता राज्यात सत्तांतर झाले आहे तेव्हाचे नगरविकास मंत्री शिंदे हे आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. शिवाय अद्यापि खातेवाटप झालेली नाही. या सर्वांचा परिणाम म्हणून गणपतीच्या मुहूर्तावरील सोडत प्रक्रिया पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे.