मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण सोडत नव्यानं निघणार, कार्यक्रम जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 08:46 PM2022-07-22T20:46:39+5:302022-07-22T20:47:24+5:30
Election Commission : राज्यात आगामी काळात होणाऱ्या १३ महापालिका निवडणुकांसाठी आता पुन्हा आरक्षण सोडत निघणार आहे. यासंबंधी अधिकृत कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
मुंबई : दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला मान्यता दिली. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाची जुनी सोडत रद्द केली असून नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात आगामी काळात होणाऱ्या १३ महापालिका निवडणुकांसाठी आता पुन्हा आरक्षण सोडत निघणार आहे. यासंबंधी अधिकृत कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
राज्यातील मुंबई महापालिकेसह १३ महापालिका निवडणुका, २५ जिल्हा परिषदा २८४ पंचायत समित्या यांची निवडणूक जाहीर झाली होती. यासाठी आरक्षण सोडतही निघाली होती. पण आता दोन दिवसांपूर्वीच ओबीसी आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे. त्यामुळे या सर्व निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार असल्याने आता या सर्व निवडणुकांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवळ, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या १३ महापालिकांना आदेश दिले आहेत.
याचबरोबर, मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी काढलेल्या आरक्षण सोडतीमधील अनुसुचित जाती आणि जमातींचे आरक्षण तसेच कायम राहणार आहे. पण सर्वसाधारण महिलांचे व सर्वसाधारण प्रवर्गात काढण्यात आलेली यादी रद्द बातल ठरवण्यात आली आणि ओबीसींचे राजकिय आरक्षण सुरक्षित करून नवीन आरक्षण सोडत २९ जुलै रोजी काढण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश दिले आहेत. त्या- त्या महापालिकेतील आयुक्तांसाठी आरक्षण सोडतीचा नवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, ५ ते ८ ऑगस्टपर्यंत अंतिम आरक्षण सोडत निघणार आहे.