कळसुबाईच्या दर्शनाला लोटला भक्तांचा महापूर
By admin | Published: October 8, 2016 12:31 PM2016-10-08T12:31:46+5:302016-10-08T12:33:38+5:30
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईच्या शिखरावर आज नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवसाचे औचित्य साधून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
घोटी (नाशिक), दि. ८ - नाशिक, नगर व ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या व महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईच्या शिखरावर आज नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवसाचे औचित्य साधून भाविकांनी कळसुबाई मातेच्या दर्शनासाठी विक्रमी गर्दी केली. भाविकाच्या गर्दीमुळे शिखरावर जाणारा लोखंडी शिड्यांचा मार्ग काही काळ ठप्प झाला. भाविकांची शिखरावर जाण्याची रीघ सुरूच आहे. यामुळे संपूर्ण शिखराला यात्रेचे स्वरूप आले आहे.
समुद्रसपाटीपासून १६४० मीटर उंचीवर असलेल्या कळसुबाई शिखरावर कळसुबाई मातेचे दर्शन घेण्यासाठी नाशिक, नगर व महाराष्ट्रातील इतर भागातून आलेल्या भाविकांची रीघ लागली होती. राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल झाले आहेत. नगर जिल्ह्यातील बारी गाव व इगतपुरी तालुक्यातील इंदोरे गावापासून या शिखरावर जाण्यासाठी पायवाट असल्याने हे दोन्ही रस्ते भक्ताच्या गर्दीने फुलून गेले आहेत.
दरम्यान आज या शिखरावर भक्तांनी गर्दी केल्याने शिखरावर जाण्यासाठी असणा-या लोखंडी शिडया पूर्णपणे भाविकांनी भरल्याने शिखरावर जाणारा व येणारा मार्ग काही काळ ठप्प झाला.
प्रशासनाचे दुर्लक्ष
राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावर दरवर्षी नवरात्रीत लाखोच्या संख्येने भाविक येत असतात.परंतु भाविकांना आवश्यक असणा-या कोणत्याही सुविधा अकोले प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात येत नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.