पुण्यात कमळ फुलले
By Admin | Published: February 24, 2017 05:07 AM2017-02-24T05:07:57+5:302017-02-24T05:07:57+5:30
पुणे महापालिकेमध्ये कमळ फुलले असून, भारतीय जनता पार्टीने निर्विवाद बहुमत मिळविले
पुणे : पुणे महापालिकेमध्ये कमळ फुलले असून, भारतीय जनता पार्टीने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला असून, कॉँग्रेसची अवस्था तर त्यापेक्षाही वाईट झाली आहे. गेल्या वेळी महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोळ्यासारखा उडून गेला आहे. मनसेला केवळ २ जागा मिळाल्या आहेत.
राष्ट्रवादीचे गटनेते व सभागृह नेते शंकर उर्फ बंडू केमसे, भाजपाचे गटनेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, उपमहापौर मुकारी अलगुडे, मनसेचे गटनेते किशोर शिंदे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांच्यासह १५ विद्यमान नगरसेवकांना पराभव पत्करावा लागला. महापौर प्रशांत जगताप, काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार रेश्मा भोसले, सिद्धार्थ शिरोळे यांनी विजयश्री संपादन केली. काँग्रेसचे अरविंद शिंदे, रिपाइंचे सिद्धार्थ धेंडे वगळता सर्व पक्षांचे गटनेते पराभूत झाले.
मतदारांनी केवळ ‘कमळ’ चिन्ह पाहून मतदान केले. त्यामुळे जनता वसाहत प्रभागातून भाजपाने आरपीआयच्या उमेदवार सत्यभामा साठे यांना पुरस्कृत करूनही एबी फॉर्मच्या गफलतीत भाजपा उमेदवार सरस्वती शेडगे निवडून आल्या. इतर पक्षातून भाजपात आलेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयश्री मिळाली आहे. रेश्मा भोसले, प्रकाश ढोरे आदींचा यामध्ये समावेश आहे.
पुणे
पक्षजागा
भाजपा९८
शिवसेना१०
काँग्रेस११
राष्ट्रवादी४०
इतर३