चैत्यभूमीवर लोटला भीमसागर!
By admin | Published: December 7, 2015 02:01 AM2015-12-07T02:01:40+5:302015-12-07T02:01:40+5:30
विवारी चैत्यभूमीवरील पहाट निळ्या रंगाने झळाळू लागली. निळ्या व पांढऱ्या वस्त्रात आंबेडकरी जनता चैत्यभूमीवर दाखल होऊ लागली. दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीकडे जाणारे रस्ते अनुयायांनी फुलून गेले.
विवारी चैत्यभूमीवरील पहाट निळ्या रंगाने झळाळू लागली. निळ्या व पांढऱ्या वस्त्रात आंबेडकरी जनता चैत्यभूमीवर दाखल होऊ लागली. दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीकडे जाणारे रस्ते अनुयायांनी फुलून गेले.
‘जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा.’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो...’ अशा अनेक घोषणा अनुयायांकडून देण्यात येत होत्या. चैत्यभूमीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बाबासाहेबांचे चित्र असलेले बॅनर्स, होर्डिंग लागले होते. नाक्या-नाक्यावर आणि फूटपाथवर बाबासाहेबांसंदर्भातील पुस्तके, त्यांची चित्र असलेले साहित्य विक्रीस ठेवण्यास आले होते. शिवाय चैत्यभूमीकडे दाखल होणाऱ्या अनुयायांच्या वाहनावर निळे झेंडे लावण्यात आले होते. या वाहनांतून येथे येणारे अनुयायी शिस्तबद्धपणे मार्गक्रमण करीत होते. महामानवाला आदरांजली वाहण्यासाठी अनुयायांनी शिस्तबद्ध रांगा लावल्या होत्या. शनिवारी रात्रीपासूनच लागलेल्या या रागांना रविवारी पहाटे महासागराचे स्वरूप प्राप्त झाले. शर्टच्या खिशाला बाबासाहेबांची छबी असलेला बिल्ला, गळ्यात निळा मफलर, डोक्यावर निळी टोपी आणि पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले अनुयायी रविवारी दिवसभर दादर परिसरात पाहण्यास मिळत होते. (प्रतिनिधी)
आंबेडकरी समाज शोधतोय आपली मुळं!
योगेश बिडवई ल्ल मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने येणारा आंबेडकरी समाज, शिवाजी पार्कवरील पुस्तक प्रदर्शनाला भेट दिल्याशिवाय राहत नाही. शिक्षणाच्या प्रसारामुळे मोठ्या प्रमाणात लिहिता-वाचता झालेला दलित समाज बाबासाहेबांशी आपली नाळ जोडू पाहतो आहे. बदलत्या आर्थिक-सामाजिक स्थित्यंतरात आंबेडकरी समाज आपली मुळं शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे, विविध विषयांवरील पुस्तक विक्रीद्वारे झालेल्या कोट्यवधींच्या उलाढालीवरून दिसून येते.
यंदा देशभरातील ३५० पेक्षा अधिक पुस्तक प्रकाशकांनी शनिवार व रविवार असे दोन दिवस शिवाजी पार्कवर स्टॉल्स लावले होते. त्यात वैचारिक साहित्याचा मोठा भरणा होता. बाबासाहेब केवळ राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचा उद्धार करणारे युगपुरुष नव्हते, तर त्यांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय विचार मांडला. त्याचेही प्रतिबिंब येथील पुस्तक प्रदर्शनात उमटले.
बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांबरोबरच, त्यांच्या विचारांचा परामर्श घेणारे ग्रंथ वाचकांना भावत असल्याचे चित्र प्रदर्शनात दिसले. जागतिकीकरणानंतर दलित समाज महामानवाच्या विचारांशी निगडित मार्ग नव्याने शोधत आहे.
त्या दृष्टीने तो साहित्य खरेदी करताना दिसला. बौद्ध धर्म, दलित व स्त्री मुक्ती चळवळ, बदलते सामाजिक-राजकीय संदर्भ यावरील पुस्तकांना, येथील प्रदर्शनात वाचकांची पसंती मिळाली. बाबासाहेबांच्या विचारांची उपयुक्तता नव्या संदर्भासह समजून घेण्याचा वाचक प्रयत्न करत आहेत. भांडवलशाहीविरोधी, डावा विचार मांडणारीही पुस्तके काही जण आवर्जून खरेदी करताना दिसले.
१९७२पासून चैत्यभूमीवर पुस्तक प्रदर्शनाला सुरुवात झाली. सुरुवातीला दोन ते तीन प्रकाशक पुस्तके विक्रीसाठी ठेवत. हळूहळू ग्रंथविक्रेत्यांचा प्रतिसाद वाढत गेला.
- ज. वि. पवार, आंबेडकरी विचारवंत
चैत्यभूमीवरील पुस्तक प्रदर्शनात साहित्य संमेलनाच्या दोन-तीन पट उलाढाल होते. आंबेडकरांचा अभ्यास करणारे पत्रकार, कार्यकर्ते, प्राध्यापक चैत्यभूमीवर येऊन पुस्तकांची आवर्जून खरेदी करतात. - कीर्तीकुमार शिंदे, नवता प्रकाशन
भोजनदान : शिवाजी पार्कवर अनुयायांना भोजनदान करण्यासाठी विविध सेवाभावी संस्थांनी स्टॉल्स लावले होते. या स्टॉल्सवर अनुयायांची रीघ लागली होती. दुपारी २ ते ४ या काळात येथील गर्दी ओसांडून वाहत होती.
आरोग्य शिबीर : शिवाजी पार्क मैदानात शिवसेनेसह महापालिका आणि बेस्ट प्रशासनातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, शिवाय उर्वरित संस्थांचाही यामध्ये समावेश होता.
क्षणभर विश्रांती : गर्दीमुळे थकलेला अनुयायी काही काळ होईना, शिवाजी पार्कलगतच्या वृक्षांखाली पहुडला होता. वृद्धांसह लहान मुलांचा यामध्ये समावेश होता, तर काही अनुयायांनी शिवाजी पार्क लगतच्या वृक्षांखाली जेवणाची पंगत मांडली होती.
पाण्याचे वाटप : महापालिकेने शिवाजी पार्कसह चैत्यभूमी परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती, परंतु येथे अलोट गर्दी उसळल्याने सेवाभावी संस्थांनी पिण्याच्या पाण्याचे स्टॉल्स उभारले होते.
पत्रकांचे वाटप : बाबासाहेबांचे विचार व त्यांची छायाचित्रे असलेल्या पत्रकांचे येथे मोठ्या प्रमाणावर वाटप केले जात होते. शिवाय काही संस्थांचे कार्यकर्ते अनुयायांना बाबासाहेबांचे विचार कथन करत होते. महत्त्वाचे म्हणजे पत्रक वाटल्यानंतर ते पत्रक रस्त्यावर कुठेही फेकून देऊ नका, असे आवाहन करण्यात येत होते.
पथनाट्याद्वारे जनजागृती : शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारावर स्वयंसेवी संघटनांकडून गाण्याच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केले जात होते. पथनाट्यातून जनजागृती केली जात होती. हे पाहण्यासाठीही अनुयायांची गर्दी उसळली होती.
महापालिकेकडून पाहणी :
चैत्यभूमीवर पुरवण्यात आलेल्या सेवांची अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी रविवारी आवर्जून पाहणी केली. नियंत्रण कक्षाला भेट देण्यासह भोजनदानाच्या व्यवस्थेचीही त्यांनी पाहणी केली.
चोख सुरक्षा व्यवस्था : सुरक्षेच्या कारणात्सव येथे सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, शीघ्र कृती दल, राज्य राखीव दलाच्या आठ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.
सभा मंडपांसमोर गर्दी : राजकीय पक्षांच्या सभादरम्यान होणारी भाषणे ऐकण्यास मिळावीत, म्हणून व्यासपीठांसमोर दुपारपासूनच अनुयायांसह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते.
दादर स्थानक नामकरणासाठी मोहीम
दादर रेल्वे स्थानकाच्या नामकरणासाठी विविध संघटनांनी दादर परिसरात बॅनर लावले होते, तसेच रेल्वे स्थानकाहून चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांच्या स्वाक्षरी घेण्यात येत होत्या. ही स्वाक्षरी मोहीम राज्यातील रेल्वे स्थानकांवरही पुढील काही दिवसांमध्ये राबविण्यात येणार आहे.