अभिनयाचा बुलंद आवाज
By admin | Published: January 7, 2017 04:19 AM2017-01-07T04:19:10+5:302017-01-07T04:19:10+5:30
ओम पुरी यांचा जन्म १८ आॅक्टोबर १९५० रोजी हरियाणातील अंबाला शहरात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पंजाबमधल्या पटियालामध्ये झाले.
ओम पुरी यांचा जन्म १८ आॅक्टोबर १९५० रोजी हरियाणातील अंबाला शहरात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पंजाबमधल्या पटियालामध्ये झाले. पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया आणि दिल्लीतील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाचेही ते विद्यार्थी होते.१९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘आक्रोश’ या चित्रपटासाठी त्यांना पहिला फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. तसेच ‘आरोहन’ आणि ‘अर्धसत्य’ या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तसेच १९९० साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘घायल वन्स अगेन’ हा त्यांचा हिंदीतील शेवटचा चित्रपट ठरला. ‘जंगल बुक’मधील बगिरा या व्यक्तिरेखेला त्यांना आवाज दिला होता.
>वादग्रस्त वक्तव्ये
वादग्रस्त वक्त व्यांमुळे ओम पुरी अनेकदा वादात सापडले होते. नुकतेच त्यांनी शहिदांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्त व्यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीका झाली होती. त्यांच्या निधनाबाबत सोशल मीडियावर अनेकांनी अश्लाघ्य भाषेत प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
‘सैनिकांना लष्करात जा, शस्त्रे उचला, असे कोणी सांगितले होते,’ असे वादग्रस्त वक्त व्य उरी हल्ल्यातील शहिदांबाबत पुरी यांनी टीव्हीवरील एका चर्चेदरम्यान केले होते. त्यामुळे देशभर त्यांच्याविरोधात संताप उसळला होता. अखेर पुरी यांनी इटावा येथील शहीद जवानाच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांची माफी मागितली होती.
‘अर्ध्याहून अधिक खासदार अडाणी आहेत. आयएएस, आयपीएस अधिकारी अंगठेबहाद्दर नेत्यांना सलाम ठोकतात, तेव्हा मला लाज वाटते,’ असे पुरी म्हणाले होते. त्यावरून वाद उफाळल्यानंतर पुरी यांनी माफी मागत, ‘मी संसद आणि संविधानाचा आदर करतो,’ असे म्हटले होते.
लोकपालसाठी अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर केलेल्या उपोषणावेळी पुरी यांनी व्यासपीठावरून राजकीय नेत्यांवर जळजळीत टीका केली होती.
‘असहिष्णुतेबाबत आमीर खानचे वक्तव्यसहन करण्यासारखं नाही. ते अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. अशी वक्तव्ये करून तुम्ही तुमच्या समुदायाला भडकावित आहात की, तयार राहा, लढा किंवा देश सोडा.’
‘ज्या देशात बीफ निर्यात करून डॉलर कमावले जातात, तिथे गोहत्याबंदी हा पाखंडीपणा आहे.’
‘नक्षलवादी हे दहशतवादी नव्हे, तर फायटर आहेत. ते त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. नक्षलवादी सामान्य माणसाला त्रास देत नाहीत.’
‘सध्या आपल्याकडे पंतप्रधान मोदींच्या कडेवर बसण्याशिवाय पर्याय नाही. कारण यापूर्वी आपण अन्य लोकांच्या कडेवर बसून अनुभव घेतला आहे.’
>गाजलेले बॉलीवूडपट
अर्धसत्य, आक्रोश, जाने भी दो यारों, माचिस, गुप्त, नरसिंह, घायल, चाची ४२०, हेराफेरी, मकबूल, चोर मचाए शोर, मालामाल विकली, बिल्लू
हॉलीवूडपट
सिटी आॅफ जॉय, वुल्फ, द घोस्ट अॅण्ड द डार्कनेस, चार्ली, विल्सन्स वॉर
गाजलेल्या मालिका
भारत एक खोज, यात्रा, कक्काजी कहिन, अंतराल, आहट, तमस
ब्रिटीश चित्रपट
माय सन द फॅनेटिक, इस्ट इज इस्ट, द पॅरोल आॅफिसर
मराठी चित्रपट
घाशीराम कोतवाल
>ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या अजरामर मराठी नाटकावर बेतलेल्या याच नावाच्या मराठी चित्रपटात त्यांनी केलेली घाशीरामाची भूमिका विशेष गाजली.
>प्रत्येक भूमिकेत प्राण फुंकला
ओम पुरी आपल्या प्रत्येक भूमिकेत प्राण ओतून व्यक्तिरेखा जिवंत करीत. ओम पुरी सामाजिक जाणीव आणि बांधिलकी असलेले कलाकार होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय चित्रपटसृष्टी, रंगभूमी तसेच एकूण समाजाचे नुकसान झाले आहे.
- विद्यासागर राव, राज्यपाल
चतुरस्र अभिनेता
ओम पुरी यांच्या निधनाने अभिनय क्षेत्र समृद्ध करणारा चतुरस्र अभिनेता गमावला आहे. सहज आणि दमदार अभिनयाने पुरी यांनी विविधांगी भूमिका अजरामर केल्या. त्यांनी साकारलेल्या आक्रोश, अर्धसत्य आदी चित्रपटांतील भूमिका कायम स्मरणात राहतील.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
दिग्गज अभिनेता
हुकमी अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेते ओम पुरी यांच्या निधनाने भारतीय चित्रपट आणि नाट्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा अभिनय हा सिनेमा आणि नाट्य क्षेत्रातील अनेक कलाकारांसाठी मार्गदर्शक ठरला आहे.
- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री
अष्टपैलू अभिनेता
ओम पुरी यांच्या निधनाने सिनेक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपले आहे. भारदस्त आवाज आणि दमदार अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. त्यांनी मराठी, हिंदी, चित्रपट, नाटकांसह हॉलीवूडपटांतही अभिनय केला.
- अशोक चव्हाण, खासदार, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
>समृद्ध अभिनेता
‘तुमचे आयुष्य तुम्ही कॉम्लिकेटेड बनवू नका, सरळ सोप्या जगण्याने तुमचे आयुष्य खूप सोपे होते,’ हा त्यांचा फंडा मी आजही पाळतो.
- गोविंद नामदेव, अभिनेता
आर्ट सिनेमाचा चेहरा
आर्ट सिनेमाचा एक मोठा चेहरा आज हरपला. एक उत्तम कलाकार म्हणून त्यांची प्रत्येक भूमिका त्यांनी चपखल निभावली.
- किशोरी शहाणे, अभिनेत्री
इंडस्ट्रीचे नुकसान
पुरी यांच्या जाण्याने या इंडस्ट्रीने एक उत्तम कलाकार गमावला आहे. त्यांची पोकळी भरून काढणे अशक्यच आहे.
- दीपक बलराज वीज, फिल्म मेकर
फन लव्हिंग
गंभीर अभिनयासाठी पुरी प्रसिद्ध असले, तरी वैयक्तिक आयुष्यात खूप फन लव्हिंग होते.
- सीम बिस्वास, अभिनेत्री
मातीतील कलावंत
कलात्मक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या सिनेमांना पुरी यांनी एक वेगळे महत्त्व प्राप्त करून दिले. ते अस्सल भारतीय मातीतील अभिनेते होते.
- कुंदन शहा, निर्माते-दिग्दर्शक
चांगला माणूस
ओम पुरी यांच्यात एक चांगला माणूस दडलेला होता.
- दिलीप ताहील, अभिनेता
सतत उणीव भासेल
इंडस्ट्रीला ओम पुरी यांची सतत उणीव भासत राहील.
- सुधा चंद्रा, अभिनेत्री
चतुरस्र नट
ओम पुरी हा चतुरस्र आणि बहुगुणी नट होता. त्याला जे काही व्यक्तिमत्त्व लाभलेले होते; त्याचा कौशल्याने त्याने उपयोग करून घेतला. थेट परदेशी दिग्दर्शकांना त्याच्या अभिनयाचा मोह पडला आणि त्याची दखल त्याने त्यांना घ्यायला लावली.
- जब्बार पटेल, दिग्दर्शक
अभिनयाची प्रेरणा
ओम पुरी यांचा ‘आक्रोश’ हा चित्रपट पाहिल्यानंतर आपणही अभिनय करू शकतो, याची मी खूणगाठ बांधली. ‘अंतर्नाद’ या श्याम बेनेगल यांच्या चित्रपटात मला ओम पुरी यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा अभिनय सहज होता; त्यात कुठलाही आव नसायचा.
- किशोर कदम,
अभिनेते- कवी
समांतर चळवळीचा खांब
ओम पुरी यांच्या निधनाने समांतर चळवळीतील एक महत्त्वाचा खांब कोसळला आहे. भारतीय समांतर चित्रपटांना त्यांनी त्यांच्या अभिनयाने ‘अर्थ’ दिला.
- सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री
चित्रपटसृष्टीचे नुकसान
पुरी यांना मराठी नाटके प्रचंड आवडायची. मराठी नाटकांकडे त्यांचा ओढा होता. मराठी कलावंतांविषयी त्यांना खूप आदर होता. त्यांचे जाणे, हे चित्रपटसृष्टीसाठी खूप मोठे नुकसान आहे.
- श्रेयस तळपदे, अभिनेता
उत्तम सहकलाकार
‘एनएसडी’पासून माझी व ओम पुरी यांची ओळख होती. ते उत्तम सहकलाकार होते, त्यांच्यासोबत काम करताना अतिशय कम्फर्टेबल वाटायचे. नाटकासाठी ते रोज सकाळी ओपन एअर थिएटरमध्ये जायचे आणि तिथे आवाजावर मेहनत घ्यायचे.
- रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेत्री