भोंगा आंदोलनात सौहार्दाचाच आवाज, नागरिकांनी दाखविले सामंजस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 07:00 AM2022-05-05T07:00:36+5:302022-05-05T07:02:24+5:30
राज्यभर मनसे कार्यकर्त्यांची धरपकड
मुंबई : मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण तापले असताना, शिवाय काही ठिकाणी भोंग्यांना परवानगी असताना मुस्लीम समाजाने पुढाकार घेत स्वत:हून भोंगे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभर सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले.
भोंग्याच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी राज्यभर कारवाई केली असून, सर्वच प्रार्थनास्थळांजवळ कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मशिदीवर लावण्यात आलेले भोंगे बंद करण्याची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. तसेच त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्वच प्रार्थनास्थळांना भोंगे लावण्याची परवानगी अवश्य दिली होती. त्यानुसार पोलिसांनी परवानगी दिलीसुध्दा. परंतु बुधवारी राज्यात ठिकठिकाणी भोंगे बंद ठेवून नमाज अदा करण्यात आली. एवढेच नव्हे तर यावेळी काढण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक व परशुराम मिरवणुकीवर मशिदीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
राज्यात बहुसंख्येने मुस्लीम वस्ती असलेल्या मालेगाव, धुळे, औरंगाबाद, मुंबई, मुंब्रा, आदी शहरांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. मंगळवारचा दिवस पाच सण घेऊन अवतरला होता. रमजान ईद, शिवजयंती, परशुराम जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती, अक्षय्य तृतीया अशा सणांचा हा दिवस होता. त्यानिमित्ताने मिरवणूक, शोभायात्रा निघाल्या. याचा ताण पोलिसांवर होता. कोणाला कोणत्या मार्गावरून मिरवणूक न्यायला परवानगी द्यायची, किती वेळ द्यायची, असा पेच पोलीस प्रशासनासमोर होता. मात्र सगळ्या मिरवणुका वेळेत आणि शांततेत झाल्या. राज्यातील एकोपा आणि सामंजस्य कसे टिकून आहे, याचा अनुभवही आला. उत्सवाला कुठेही धार्मिक रंग न देता लोक एकमेकांच्या उत्सवात सहभागी झाले.
शिवजयंती, परशुराम जयंतीच्या मिरवणुकीवर मशिदीवरून पुष्पवृष्टी
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे ब्राह्मण समाजाने काढलेल्या परशुराम जयंतीच्या मिरवणुकीवर आणि शिवसेनेने काढलेल्या मिरवणुकीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर सावकार मशिदीच्या मनोऱ्यावरून पुष्पवृष्टी करण्यात आली. आम्ही सगळे बांधव एक आहोत, हाच मानवतेचा आणि बंधुभावाचा संदेश ऐक्य जपणाऱ्या मुस्लीम समाजाने दिला.
शिर्डीचा भोंगा चालू ठेवा
शिर्डीतील साईबाबांची आरती सर्वांना ऐकता यावी यासाठी साईबाबा मंदिरावरील भोंगा चालू ठेवावा अशी मागणी मुस्लीम समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. शिर्डीतील साई मंदिरावरील ध्वनिक्षेपक पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावा, अशी मागणी बुधवारी सायंकाळी शिर्डीतील मुस्लीम समाजाने शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
औरंगाबादेत सामाजिक एकोप्याची आरती
औरंगाबाद शहरातील संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेलीपुरा भागात बुधवारी दुपारी हिंदू-मुस्लिम व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ‘वरद हस्ताय’ गणपती मंदिरात आरती केली. रमजान ईदनिमित्त एकमेकांना मिठाई भरवून सामाजिक एकतेचा नवा आदर्श घडविला.
आमचा धर्म ‘व्यापार’ आहे, शहरात कुठेही काही झाले तर त्याचा परिणाम आधी दुकानदारांवर होतो. मोठे आर्थिक नुकसान होते. मात्र, मागील काही वर्षांपासून येथील चेलीपुरा व्यापारी संघटनेने पुढाकार घेऊन शांती, सामाजिक एकोपा राखण्याचे काम हाती घेतले आहे. त्याची प्रचिती यंदाही बघण्यास मिळाली.