प्रेमासाठी वाट्टेल ते... तरुणी बनली चोर
By admin | Published: June 20, 2017 02:54 AM2017-06-20T02:54:37+5:302017-06-20T06:01:12+5:30
प्रेमासाठी वाट्टेल ते करणारा प्रियकर आपण नेहमीच बघतो. मात्र, प्रियकराची हौस-मौज भागविण्यासाठी २६ वर्षीय तरुणी
मनीषा म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रेमासाठी वाट्टेल ते करणारा प्रियकर आपण नेहमीच बघतो. मात्र, प्रियकराची हौस-मौज भागविण्यासाठी २६ वर्षीय तरुणी सराईत घरफोड्या करणारी गुन्हेगार बनल्याचे घाटकोपर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. विशेष म्हणजे, या तरुणीने याची सुरुवात स्वत:च्या घरापासूूनच केली. ती मोलकरणी बनून प्रियकरासाठी घरफोड्या करत असे. अखेर पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत.
गोवंडी परिसरात राहणारी चारू धर्मा रघुवीर ही २६ वर्षीय तरुणी. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या आई-वडिलांसोबत राहणाऱ्या चारूची एका तरुणासोबत मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रियकराची हौसमौज, त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी चारूने सुरुवातीला स्वत:च्या घरातील पैशांची चोरी करण्यास सुरुवात केली. यामुळे कुटुंबीयांनीही तिला दूर केले. त्यानंतर, तिने चक्क घरफोडीचा मार्ग निवडल्याची धक्कादायक माहिती चारूच्या चौकशीतून समोर आली आहे.
घाटकोपर परिसरातील महिंद्रा पार्क इमारतीत चारू सहा महिन्यांपूर्वी मोलकरणीचे काम करू लागली. तिने काही दिवसांतच घर मालकाचा विश्वास संपादन केला. गेल्या आठवड्यात मालकाचे संपूर्ण कुटुंब कामानिमित्त बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत, चारूने घराची बनावट चावी बनवून, घरातील दोन लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. मालक घरी आल्यानंतर, त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी तत्काळ घाटकोपर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला.
घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या तपासात, सुरुवातीला पोलिसांनी चावी बनविणाऱ्यांची धरपकड सुरू केली. त्यापैकी एकाच्या चौकशीत चारूने चावी बनविल्याचे उघड झाले. घटनेच्या वेळेपासून मोलकरीण चारू गायब झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी चारूची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यास सुरुवात केली, तेव्हा चारूविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. मोलकरीण म्हणून कामावर रूजू व्हायचे. मालकाचा विश्वास संपादन होताच, संधी साधून घराची बनावट चावी बनवायची. याच चावीच्या मदतीने ती घर साफ करून ती पसार होत असे.
प्रियकराकडेही चौकशी घाटकोपर पोलिसांचा तपास सुरू असतानाच, चारू शिर्डीला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, घाटकोपर पोलिसांनी शनिवारी सापळा रचून
चारूला बेड्या ठोकल्या.पोलीस कोठडीत असलेल्या चारूच्या चौकशीत, प्रियकराच्या हौसेसाठी ती घरफोड्या करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चारूने आतापर्यंत किती घरफोड्या केल्या, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.तिने चोरी केलेले दागिने सराफाला विकले होते. ते दागिने पोलिसांनी हस्तगत केले, तसेच प्रियकरालाही
त्यातील ३५ हजार रुपये दिले. प्रियकराकडेही पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत.