प्रेम करा... पण, जपून

By Admin | Published: February 9, 2016 03:21 AM2016-02-09T03:21:46+5:302016-02-09T03:21:46+5:30

आॅनलाइन फ्रेंडपासून सुरुवात झालेले नाते कधी प्रेमात रूपांतरित होते, हे अनेकदा कळतही नाही. आॅनलाइनच्या आभासी जगात उभे केलेले चित्रच खरे मानून आयुष्यातील जीवनसाथी निवडणाऱ्या

Love ... But, be saved | प्रेम करा... पण, जपून

प्रेम करा... पण, जपून

googlenewsNext

- मनीषा म्हात्रे, मुंबई

आॅनलाइन फ्रेंडपासून सुरुवात झालेले नाते कधी प्रेमात रूपांतरित होते, हे अनेकदा कळतही नाही. आॅनलाइनच्या आभासी जगात उभे केलेले चित्रच खरे मानून आयुष्यातील जीवनसाथी निवडणाऱ्या अनेकांना वास्तवात मात्र पश्चात्तापच पदरी पडतो. ‘तुझ्यासाठी काही पण...’ असे म्हणणारे अनेक प्रेमवीर वास्तवात मात्र त्यांना एकटेच सोडून निघून जातात. तेव्हा त्यांचा किती फायदा घेतला गेला, किती फसवले हे समोर येते. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाइन फिव्हर सुरू झाल्यावर अनेक ‘सिंगल्स’ना आपल्यालाही जोडीदार मिळावा असे वाटू लागते. त्यामुळे आॅनलाइन सर्च सुरू होतो. पण आॅनलाइन होणारी फसवणूक टाळण्यासाठी ‘प्रेम करा... पण, जरा जपूनच’ असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

सध्या तरुण पिढी ‘फेस टू फेस’ कमी बोलते, मात्र ‘स्क्रीन टू स्क्रीन’ कनेक्ट राहणे, त्यांना अधिक सोपे आणि सोयीचे वाटते. त्यामुळेच फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, हाइकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये तरुणाई गुरफटली आहे. या साइट्सवर लोकप्रिय होण्यासाठी जास्त फॉलोअर्स, फं्रेड्स असणे आवश्यक असते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीची काहीही माहिती नसताना त्या व्यक्तीला सर्कल अथवा अकाउंटमध्ये अ‍ॅड केले जाते. समोरची व्यक्ती महिला आहे की पुरुष हेदेखील माहीत नसताना, त्या व्यक्तीशी मैत्री केली जाते. आणि त्यानंतर तरुण-तरुणी तसेच विशेषत: महिला आपली व्यक्तिगत माहिती, फोटो यावर सतत अपलोड करतात. मात्र स्वत:च्या सुरक्षेचा विचार करत नाहीत. त्यामुळे अनोखळी व्यक्तीशी रात्ररात्रभर चॅटिंग करणे, फोटो शेअर करणे, स्वत:ची माहिती, स्वत:चे पासवर्ड देणे हे चालू असते. त्यामुळेच आॅनलाइन ओळखीतून अत्याचार, ब्लॅकमेलिंग, फसवणूक अशा सायबर गुन्ह्यांना तरुणाई बळी पडत आहे.
अन्य गुन्ह्यांच्या बरोबरीने सायबर गुन्ह्यांना आळा घालणे पोलिसांसमोर आव्हान आहे. नॅशनल क्राइम ब्युरोने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र सायबर क्राइमच्या गुन्ह्यांमध्ये आघाडीवर आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात २०१४ मध्ये १ हजार ८७९ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ९४२ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. २०१३ च्या तुलनेत याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. मुंबईलाही या आरोपींनी टार्गेट केल्याने नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. आता आरोपीही टेक्नोसॅव्ही होत आहेत. मुंबई पोलिसांनी २०१४ मध्ये ६०४ गुन्हे दाखल केले होते, तर २०१५ मध्ये तब्बल ९१२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी २२९ आरोपींवर कारवाई करण्यात आली. २०१५ मध्ये दोनशे गुन्ह्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साइटवर मित्र जोडण्यापेक्षा प्रत्यक्षात म्हणजेच ‘फेस टू फेस’ असलेली मैत्री किती तरी पटीने चांगली असल्याचे पोलीस आणि मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे.

आॅनलाइन प्रेम जिवावर बेतले !
१२ डिसेंबर २०१५ : फेसबुकवरून झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर मुलगा मुलीच्या प्रेमात पडला आणि त्यानूच मुलीची छेड काढणे, तिला त्रास देणे सुरू झाले. याला कंटाळून धारावीतील मुथ्थुसेल्वी या कॉलेज तरुणीने कॉलेजबाहेर विष प्राशन करून आत्महत्या केली.

१९ मे २०१४ : फेसबुकवर चॅटिंग करीत झालेली मैत्री मालाड येथील एका शिक्षिकेला भलतीच महागात पडली. तब्बल सव्वापाच लाख रुपयांची फसवणूक झाल्यानंतर, त्या शिक्षिकेने केलेल्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी कोनार गिप्सन या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मालाड येथे राहणाऱ्या या शिक्षिकेसोबत चॅटिंग करताना कोनार गिप्सन या इसमाने, आपण लंडन येथील सिव्हिल इंजिनीअर असल्याची बतावणी करून तिच्याकडून लाखो रुपये उकळले.

२१ मार्च २०१४ : आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरुणासोबत फेसबुकवर ओळख करणे, एका गृहिणीला चांगलेच महागात पडले. फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणाने त्या गृहिणीला धमकावून तिचा उपभोग घेतला. यावरच न थांबता, तिची नग्नावस्थेतील छायाचित्रे पतीला दाखवण्याच्या धमक्या दिल्या आणि तिच्याकडून पैसे उकळले. शेवटी कंटाळून त्या गृहिणीने तक्रार व्ही.बी. नगर पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी, मुलुंड पोलिसांनी धार्मिक सोमय्या (२३) या तरुणाविरोधात, अत्याचारासह ब्लॅकमेल करणे, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या तरुणाला अटक करून पुढील तपासासाठी हे प्रकरण विनोबा भावेनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले.

१० सप्टेंबर २०१५ : कांदिवलीत राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीला एका अनोळखी मुलाशी मैत्री करणे महागात पडले. त्याने या मुलीची अश्लील छायाचित्रे बनवून, तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. गुन्हे शाखा ११ च्या पथकाने या तरुणाला रायगड येथून अटक केली आणि या मुलीची मानसिक त्रासातून सुटका झाली. प्रिया (नाव बदललेले) ही १७ वर्षांची मुलगी कांदिवलीत राहते. फेसबुकवर तिला प्रथमेश साळुंखे (२०) या तरुणाची फेसबुकमध्ये फ्रेंडशिप रिक्वेस्ट आली. त्या दोघांचे काही सामायिक मित्र (म्युच्युअल फ्रेंडस) होते. त्यामुळे प्रियाने ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर दोघांचे फेसबुकवर चॅटिंग सुरू झाले. प्रथमेशने प्रियाबाबतची सर्व माहिती जाणून घेतली होती. त्याने प्रियाचे खासगी फोटो मागवले. त्यानंतर फोटोशॉपच्या आधारे तिचे अश्लील फोटो बनवले. या छायाचित्रांच्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करू लागला. जर सात हजार रुपये दिले नाहीस, तर ही छायाचित्रे इंटरनेटवर टाकेन, अशी त्याने धमकी दिली. घाबरलेल्या प्रियाने आपल्या घरी हा प्रकार सांगितला.

काय काळजी घ्यावी?
अनोळखी व्यक्तीची फ्रेंडशिप रिक्वेस्ट खात्री केल्याशिवाय स्वीकारू
नये.
एखाद्याच्या फेसबुक प्रोफाइलमध्ये त्याचे फोटो नसतील किंवा फार काही पोस्ट नसतील तर सावध राहावे.
राजकारणी किंवा प्रसिद्ध
व्यक्ती सगळ्यांच्या फेसबुक प्रोफाइलमध्ये असतात. बनावट प्रोफाइल बनवणारे त्यांना आपल्या फेसबुकमध्ये जोडतात. त्यामुळे आपल्याला असे बनावट प्रोफाइल पाहिल्यावर सामायिक मित्र असल्याचे वाटते.
कुणालाही आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये. फेसबुक मित्राला भेटायला जाताना एकट्याने जाऊ नये. परदेशी मित्र असतील तर त्यांच्या प्रेमात पडण्याचा मोह टाळावा.

सावधगिरी बाळगणे गरजेचे
सोशल मीडियावरील विविध माध्यमांद्वारे समोरच्या व्यक्तीची खातरजमा केल्याशिवाय त्याच्याशी संवाद साधू नये. अनेकदा अनोळखी व्यक्तींकडून खोटी माहिती देऊन फसवणूक केली जाते. त्यामुळे याला रोखण्यासाठी पोलिसांकडून टिष्ट्वटर अकाउंट, शिक्षकांच्या सभेद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. मात्र प्रत्येकानेच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
- धनंजय कुलकर्णी,
मुंबई पोलीस प्रवक्ते

एकटेपणा घालवण्याची
धडपड येते अंगाशी
धावपळीच्या जीवनात कुटुंब, नातेवाईक जवळचे मित्र-मैत्रीण यांच्यातला संवाद हरवत आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या व्हर्च्युअल जगातील लाइफ स्टाईलमधील रंगीबेरंगी दुनियेत ही मंडळी स्वत:ला झोकून देणे पसंत करतात. भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तींसोबत आपल्या भावना व्यक्त करतात. त्यामध्ये कुठे तरी त्यांना आपण सेफ असल्याचे वाटते. मात्र हेच त्यांच्यासाठी घातक ठरते. कुठे तरी आयुष्यातील एकटेपणा घालवण्याच्या सुरू असलेल्या धडपडीबाबत त्यांनी आपण काय करतो, काय नाही, याबाबत विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकांकडून याबाबत पुढाकार घ्यावा. त्यांच्याबरोबर फक्त पालक म्हणून नाही, तर मित्र-मैत्रिणींप्रमाणे नाते निर्माण करा. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा.
- डॉ. युसुफ माचिसवाला,
मानसोपचार तज्ज्ञ, जेजे रुग्णालय

Web Title: Love ... But, be saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.