प्रेमाला विरोध ‘चालणार नाही’
By admin | Published: January 25, 2015 12:51 AM2015-01-25T00:51:03+5:302015-01-25T00:51:03+5:30
अत्यंत जबाबदारीने प्रेम हा अधिकार म्हणून स्वीकारताना प्रेमाला विरोध करणाऱ्यांना ‘हे चालणार नाही’ असे सांगण्याचे धाडस दाखवावे लागेल, असे प्रतिपादन मानवी हक्क
नंदनवन येथे मानवी साखळीचे आयोजन : प्रेमीयुगुलास मारहाण प्रकरणाचा निषेध
नागपूर : अत्यंत जबाबदारीने प्रेम हा अधिकार म्हणून स्वीकारताना प्रेमाला विरोध करणाऱ्यांना ‘हे चालणार नाही’ असे सांगण्याचे धाडस दाखवावे लागेल, असे प्रतिपादन मानवी हक्क संरक्षण विश्लेषक अॅड. असीम सरोदे यांनी येथे केले.
सहयोग ट्रस्ट या सामाजिक संस्थेने शनिवारी नंदनवन परिसरात मानवी साखळीचे आयोजन करून लातूर येथे प्रेमीयुगुलास मारहाणप्रकरणी ‘गनिमी कावा’ या संघटनेचा निषेध नोंदविला. यावेळी ते बोलत होते. मानवी साखळीचे नेतृत्व ‘सहयोग ट्रस्ट’चे विश्वस्त डॉ. रवींद्र भुसारी आणि ‘ह्युमन राईट्स अॅण्ड लॉ डिफेन्डर्स’ समन्वयिका अॅड. स्मिता सरोदे-सिंगलकर यांनी केले. प्रेम करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. घटनात्मक अधिकारांना नाकारणाऱ्या प्रवृत्ती तयार होणे लोकशाहीला घातक आहे, असेही अॅड. सरोदे म्हणाले.
याप्रसंगी ‘कहो प्रेम से रहो प्रेमसे’, ‘सामाजिक नियम महत्त्वाचे प्रेमही तसेच महत्त्वाचे‘, ‘संविधान का हो सम्मान प्यार का ना हो अपमान’, असे फलक हाती घेऊन शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी मानवी साखळीत सहभागी झाले होते.
वुमेन्स कॉलेज आॅफ आर्टस् अॅण्ड कॉमर्सच्या विद्यार्थिनी, प्राध्यापक यांच्यासह कॉलेजचे प्राचार्य मोहन दीक्षित तसेच मनपा बँकेचे संजय शृंगारपवार प्रामुख्याने उपस्थित होते. हृदयाच्या आकाराचे रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. (प्रतिनिधी)