लव्ह फूड; हेट वेस्ट
By admin | Published: October 18, 2016 04:05 AM2016-10-18T04:05:39+5:302016-10-18T04:05:39+5:30
कुपोषण, भूकबळी यामुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या भारतात वर्षाला तब्बल ५० हजार कोटींचे अन्न अक्षरश: फुकट जातं
- अश्विनी भाटवडेकर
कुपोषण, भूकबळी यामुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या भारतात वर्षाला तब्बल ५० हजार कोटींचे अन्न अक्षरश: फुकट जातं, असं सांगितलं तर विश्वास बसेल का? पण, दुर्दैवाने हे खरं आहे. आपल्याकडील लग्न समारंभात तयार होणारं जेवण, कोणत्याही पार्टीतील पदार्थ एवढंच काय कचराकुंड्या, अगदी रस्तेदेखील याची पुरेपूर साक्ष देतील. एकीकडे अन्नाला मोताद असणारी माणसं... आणि दुसरीकडे मात्र सर्रास वाया जाणारं अन्न. केवढा हा विरोधाभास!
अन्नाचा हा अपव्यय टाळण्यासाठी देशातच नव्हे तर अगदी जागतिक स्तरावरही प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना अजूनही म्हणावं तसं यश येत नसलं तरी थोड्याफार प्रमाणात सर्वांमध्ये जागृती निर्माण होते आहे, हेही नसे थोडके.
लग्न, कॅन्टीन, हॉटेल्स, अन्य कौटुंबिक कार्यक्रमात अन्नाचा अपव्यय ठरलेलाच. असे अन्न फुकट जाणे, हे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही हानिकारक असते, हे अनेकांना माहीत नसते. कारण, अन्न फुकट गेले तर ते तयार करण्यासाठी लागणारे पाणी, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. शिवाय, त्या धान्यावरील प्रक्रिया, त्यासाठी वापरली जाणारी वीजही फुकट जाते. या सगळ्याचा हिशेब मांडला तर भारतात दरवर्षी ५८ हजार कोटींचे अन्न फुकट जाते.
थोडक्यात काय, तर अन्न फुकट जाणे, ही एक अत्यंत वाईट गोष्ट आहे. यात आपला तर सहभाग नाही ना, याचा विचार आपण करायला हवा. घरातदेखील अन्न शिजवताना आपण भारंभार स्वयंपाक करत नाही ना, याचं भान राखायला हवं. ‘खाऊन माजा; पण टाकून माजू नका’, अशी एक म्हण आपल्याकडे आहे. यंदाच्या जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने आपण हे भान राखू शकलो, तरी चिक्कार... नाही का?
>ठाण्यातही अन्नदान
मुंबईच्या तुलनेत ठाण्यात हे काम कमी दिसते. मुंबईच्या डबेवाल्यांपैकीच भांडुप, मुलुंडला डबे पोहोचवणारे ज्ञानेश्वर कणसे हे काम करतात. ‘उरलेलं अन्नं मी गरीब वस्त्यांमध्ये देतो, हे कळल्यामुळे ठाण्यातही अनेक ठिकाणांहून मला फोन येतात’, असे कणसे सांगतात. प्रामुख्याने तीनहातनाक्याच्या ब्रीजखालच्या लोकांना हे अन्न पुरवलं जातं.
>एकीकडे उपाशीपोटी झोपणारी २० कोटी लोकसंख्या आणि त्याच वेळी ५० हजार कोटींचे वाया जाणारे अन्न असा विरोधाभास भारतात पाहायला मिळतो. एकीकडे अधिक धान्य पिकवा म्हणून शेतीत प्रयोग, संशोधन सुरू आहेत. त्याच वेळी वाया जाणारे अन्न गरजूंच्या मुखात जावे, यासाठीही अनेक हात राबताहेत, त्या उपक्रमांचा आढावा...
>डबेवाल्यांची रोटी बँक
मुंबईचे डबेवाले जगभरात फेमस आहेत. वक्तशीरपणे आणि चोख काम करणारे म्हणून त्यांची ख्याती आहे. अन्न फुकट जाऊ नये, यासाठी या डबेवाल्यांनीदेखील कंबर कसली आहे. ‘रोटी बँक’ या नावाने त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या योजनेला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे डबेवाला युनियनचे प्रवक्ता सुभाष तळेकर सांगतात.एकीकडे पार्ट्या, समारंभांमध्ये जेवण जास्त झाल्याने ते फेकून देण्याची वेळ येते; तर दुसरीकडे अनेक लहान मुले, मोठी माणसे रस्त्यांवर उपाशीपोटीच झोपी जातात. ही परिस्थिती बदलावी, यासाठी या उपक्रमाची सुरुवात झाली. प्रामुख्याने प्रसिद्धिमाध्यमांद्वारेच याची माहिती अनेकांना झाली आणि त्यानंतर मात्र या योजनेला खूप प्रतिसाद मिळाला. पार्ट्या तसेच लग्न समारंभाचे आयोजन करणाऱ्या अनेकांकडून अशा प्रकारे उरलेले अन्न डबेवाल्यांकडे आणि त्यांच्याकडून ते गरीब वस्तीत पोहोचवण्यात येऊ लागले. त्यातही प्रामुख्याने ९ वाजेपर्यंत हे जेवण त्यांना मिळेल, याची आम्ही काळजी घेत असल्याचेही तळेकर म्हणाले. यातही जेवण टिकण्याची मोठी अडचण असते. कारण, सकाळी किंवा दुपारी केलेला हा स्वयंपाक असतो. त्यातही तो वारंवार हाताळला जात असल्याने, खराब व्हायची शक्यता असते. यासाठी आम्हाला अन्न टिकवता येईल, अशा गोष्टींची गरज आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्नही सुरू असल्याचे ते सांगतात. दिवाळीपर्यंत यावरही तोडगा निघू शकेल.