प्रेमा या न बंध कुणाचे, ‘लगीनगाठ’ तिथे बसली!

By Admin | Published: January 1, 2015 12:50 AM2015-01-01T00:50:03+5:302015-01-01T08:44:45+5:30

आंतरजातीय प्रेमविवाहात ते अडकले, पण घरच्यांचा विरोध होताच...अशातच तो साधा मत्स्यव्यावसायिक, तर ती बड्या घरची... प्रेमाचे पहिले दिवस भुर्रकन उडाल्यानंतर वास्तवाचे चटके बसू लागले... पायापेक्षा तोकडे

The love of love, the voice of the tongue, sitting there! | प्रेमा या न बंध कुणाचे, ‘लगीनगाठ’ तिथे बसली!

प्रेमा या न बंध कुणाचे, ‘लगीनगाठ’ तिथे बसली!

googlenewsNext

हिनाकौसर खान-पिंजार - पुणे
आंतरजातीय प्रेमविवाहात ते अडकले, पण घरच्यांचा विरोध होताच...अशातच तो साधा मत्स्यव्यावसायिक, तर ती बड्या घरची... प्रेमाचे पहिले दिवस भुर्रकन उडाल्यानंतर वास्तवाचे चटके बसू लागले... पायापेक्षा तोकडे
असणारे त्याचे अंथरूण उघडे पडायचे अन् तिची कानभरणी व्हायची... नैराश्यातून एक दिवस त्यांनी विष घेतले, पण नियतीने डाव संपवला नव्हता... वाचले खरे, पण वेगळे झाले.... तिच्या खुनाच्या प्रयत्नाचा त्याच्यावर आळ अन् घटस्फोटाचा घाटही घालण्यात आला.. पण फिल्मी स्टाईलने लग्नाच्या वाढदिवशीच सुनावणीची तारीख आली... त्याने थेट केकच आणून तिला, तुरुंगवासाच्या याताना सांगितल्या, प्रेमाने साद घातली तसे झाले गेले गंगेला मिळाले. न्यायालयानेही इतरांचा विरोध डावलून दोघांनाही एकत्रित नांदण्याची मुभा दिली.

नायकाची हलाखीची परिस्थिती, तर नायिका बड्या घरातील, अशी स्थिती एखाद्या चित्रपटाला शोभून दिसणारी,पण या न्यायालयातील प्रकरणामध्ये मात्र ही वस्तुस्थिती होती.

प्रेमातून झालेला आंतरजातीय विवाह आणि नंतर परिस्थितीने आलेले नैराश्य हे तर प्रत्येकाच्या वाट्याला येतं खरं. पण, यातून मार्ग काढत या जोडप्याने समाजासमोर एक वेगळे उदाहरण ठेवले आहे.

रोहित (वय २३), संगीता (वय २१) दोघांनी नोव्हेंबर २०१२ मध्ये लग्न केले. मात्र, आंतरजातीय विवाह असल्याने संगीताच्या घरच्यांचा प्रचंड विरोध होता. संगीताही व्यावसायिकाची, मोठ्या बंगल्यात राहणारी मुलगी होती; तर रोहितचा मत्स्यव्यवसाय हा अतिशय छोटा होता.
त्याचे घर ही १० बाय १० ची एक खोली होती. त्यामुळे लग्नाच्या काही दिवसांतच ओढाताण जाणवू लागली आणि तिलाही त्यात जुळवून घेणे अवघड जाऊ लागले. शिवाय संगीताचे वडील तिला वारंवार भेटून घरी येण्यास विनवत होते. त्याच्या तुटपुंज्या परिस्थितीची जाणीव करून देत होते.
रोहित आपणही कमवू, चांगले आयुष्य जगू असे सांगत होता, मात्र रोजच कटकटी सुरू होत्या. निराश होऊन ‘जीना-मरने का साथ’ द्यायाचे या उक्तीचा विचार करून शनिवारवाड्यावर जाऊन विषप्राशन केले.
वाटेतच बेशुद्ध पडल्यानंतर स्थानिकांनी त्यांना ससूनमध्ये दाखल केले. संगीताच्या वडिलांनी तिला खासगी रूग्णालयात दाखल केले. तिथून बरी होऊन बाहेर पडल्यानंतर वडिलांनी रोहितवर खुनाच्या प्रयत्नाची तक्रार दिली. तिने तसा जबाबही दिला.
तो ससूनमध्येच खितपत होता. तक्रार झाल्याचे त्याला माहीतही नव्हते. एक दिवस पोलिसांनी अटक केले तेव्हा हकिगत समोर आली. तिच्या वडिलांनी दोघांना भेटू दिले नाही की त्याच्या अटकेविषयी सांगितले नाही.

दरम्यान, तिने घटस्फोटाचा खटला दाखल केला. त्याला तिला घटस्फोट द्यायचा नव्हता. वडील तिच्यावर दबाव आणत होते. न्यायालयातही बोलू देत नव्हते. त्याने थेट तिच्या कामाच्या ठिकाणी भेटून ‘तुझ्यासोबतच संसार करायचाय’ हे सांगितले. त्यानंतर तिला अटक होऊन १५ दिवस तुरूंगवास कसा झाला, काय भोगलं सर्व सांगितलं. या घटनेपासून ती अनभिज्ञ होती. रोहितचे वकील अ‍ॅड. अफरोज शेख यांनी दोघांनाही एकत्रित बोलावून समुपदेशन केले.

तिचे मनही विरघळले, पण वडिलांचा दबाव होताच. रोहितने पुढची तारीख लग्नाच्या वाढदिवशीच घेतली. त्यादिवशी केकच नेला न्यायालयापुढे. न्यायाधीशांनीही इतरांना कोर्टाबाहेर काढून दोघांचे म्हणणे ऐकले. एकत्र राहण्याची स्पष्ट इच्छा दिसतच होती. न्यायालयाने त्यांना पाठिंबा देत दोघाना एकत्र नांदण्याची मुभा दिली अन् संरक्षण हवे असल्यास तेही देण्याचे मान्य केले, अशी माहिती अ‍ॅड. शेख यांनी दिली.

Web Title: The love of love, the voice of the tongue, sitting there!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.