लव्ह अथवा अरेंज मॅरेजचे घटस्फोटाला नाही वावडे
By Admin | Published: February 12, 2016 03:35 AM2016-02-12T03:35:22+5:302016-02-12T03:35:22+5:30
जोडप्यांचे घटस्फोट होण्यामध्ये ‘लव्ह मॅरेज’ किंवा ‘अरेंज मॅरेज’असा कोणताही भेद आता उरलेला नाही. याउलट तंत्रज्ञान तसेच कम्युनिकेशनच्या वाढलेल्या विविध साधनांमुळे जोडप्यांमधील
पुणे : जोडप्यांचे घटस्फोट होण्यामध्ये ‘लव्ह मॅरेज’ किंवा ‘अरेंज मॅरेज’असा कोणताही भेद आता उरलेला नाही. याउलट तंत्रज्ञान तसेच कम्युनिकेशनच्या वाढलेल्या विविध साधनांमुळे जोडप्यांमधील संवाद कमी झाला असून, दुरावा वाढण्याचे व घटस्फोटापर्यंत जाण्याचे हे मुख्य कारण असल्याचे मत कौटुंबिक खटल्यांमध्ये काम करणाऱ्या विधिज्ञांनी व्यक्त केले.
मुळात, अद्यापही आपल्या समाजात, अरेंज मॅरेज करणाऱ्यांचे प्रमाण अधिक
असल्याने घटस्फोटाच्या प्रमाणाची तुलना करणे अवघड असल्याचेही त्यांनी
स्पष्ट केले.
काही वर्षांपूर्वी महिलांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविषयीची जाण नव्हती. जाणीव झाल्यानंतरही कायद्याबाबत अनभिज्ञता होती. त्यामुळे बहुतांश वेळा अरेंज मॅरेजमधील स्त्रिया तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत होत्या. तसेच, अनेकदा लव्ह मॅरेजमध्येच घटस्फोट घडतात, अशी धारणाही प्रचलित झालेली होती.
मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र वेगळेच
झाले असून, घटस्फोटामध्ये लव्ह
मॅरेजमधील असमंजसपणा हे कारण हळूहळू कमी झाल्याचे दिसत आहे. या उलट अरेंज किंवा लव्ह मॅरेज असे वावडे
घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांना
नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
स्त्रिया सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याने आपल्यावर अन्याय होत असल्यास त्याविरोधात पाऊल उचलण्याचे धैर्य त्यांच्यात दिसत आहे.
त्याचबरोबर वाढत्या
कम्युनिकेशनच्या जमान्यात जोडप्यांतील हरवलेला संवाद, अवास्तव अपेक्षा आणि नव्याने समोर येत असणारे ‘एक्स्टा मॅरेटल अफेअर’ ही कारणे असल्याचे दिसत
आहे. त्यामुळे फक्त लव्ह मॅरेजमध्येच घटस्फोटाचे प्रमाण आहे किंवा
अॅरेंज मॅरेजमध्ये असा भेदाभेद
उरला नसल्याचे कायदेतज्ज्ञांनी
स्पष्ट केले आहे.
लव्ह व अरेंज अशा दोन्ही प्रकारची जोडपी घटस्फोटासाठी अर्ज करीत आहेत. आमच्याकडील खटल्यांचा विचार केला, तर अरेंज मॅरेजमधील जोडपी अधिक दिसत आहेत. मात्र, लग्नाचा कोणताही प्रकार असला, तरी त्यांची कारणे सारखीच असतात. दोघांमध्ये समजून घेण्याची वृत्ती तपासण्याची सोय आपल्याकडे नाही. स्थळ दाखवताना मांडलेले मुद्दे आणि वास्तव यात फरक असतो. मतभेद, अपेक्षाभंग हेही कारणे असताताच. तसेच आता नव्याने ‘एक्स्ट्रा मॅरेटल’ अफेअर हेही घडत आहे.
- अॅड. रमा सरोदे
लव्ह मॅरेजमध्ये असणारा उथळपणा यामुळेही घटस्फोटाचे त्यात प्रमाण अधिक आहे. अरेंज मॅरेजमध्ये कुटुंबीयांची संमती असते. त्यामुळे पती-पत्नी सहजासहजी घटस्फोटासाठी राजी होत नाहीत. मात्र, लव्ह मॅरेज करताना आणि मोडताना अशा दोन्ही वेळेस मुले आपल्या कुटुंबीयांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.
- अॅड. अफरोज शेख
पूर्वीसारखे लव्ह मॅरेजमुळे घटस्फोट हा विषय आता तितका ज्वलंत राहिला नाही. आताही काही वेळा असे घडते, मात्र त्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. या उलट आता अरेंज किंवा लव्ह मॅरेज असले, तरी पती-पत्नी दोघे नोकरी करत असतात. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असतात. सोशल माध्यमांचा अतिवापर वाढला आहे, याचा परिणाम नात्यांवर होताना दिसत आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या नात्यांमध्ये घटस्फोटाची ही कारणे दिसत आहेत.- अॅड. भारती जागडे
दोन्ही प्रकारच्या लग्नांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण दिसत आहे. पूर्वी स्त्रियांना कायद्याची जाण नव्हती, मात्र आता मोठ्याप्रमाणात कायद्यांची माहिती झाली; तसेच आर्थिक स्वावलंबनही वाढले आहे. पूर्वी कुटुंबाकडून शारीरिक, मानसिक, आर्थिक स्थैर्याची अपेक्षा असे. मात्र आता यासाठी लग्न करण्याची आवश्यकता आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारा आणि तसे जगू पाहणारा वर्ग निर्माण होऊ लागला आहे.
- अॅड. सुप्रिया कोठारी