कमी खर्चात शिक्षण, विद्यार्थ्यांची फसवणूक

By Admin | Published: January 31, 2017 12:58 AM2017-01-31T00:58:51+5:302017-01-31T00:58:51+5:30

बंगळुरू येथील महाविद्यालयात अत्यल्प खर्चात नर्सिंगचे शिक्षण देण्याचे आमिष दाखवून नागपुरातील शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

Low cost education, cheating of students | कमी खर्चात शिक्षण, विद्यार्थ्यांची फसवणूक

कमी खर्चात शिक्षण, विद्यार्थ्यांची फसवणूक

googlenewsNext

नागपूर : बंगळुरू येथील महाविद्यालयात अत्यल्प खर्चात नर्सिंगचे शिक्षण देण्याचे आमिष दाखवून नागपुरातील शेकडो विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सुरुवातीला नाममात्र शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. मात्र सत्राच्या मध्यावर लाखो रुपयांची मागणी संस्थाचालक व संस्थेच्या नागपुरातील एजंट महिलेकडून केली जात आहे. तसेच शुल्क न दिल्यास विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र परत न करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला आहे.
विद्यार्थी शोषण विरोधी कृती समितीच्या नागसेन बडगे यांच्या नेतृत्वाखाली काही विद्यार्थी व पालकांनी याप्रकरणी सोमवारी रविभवन येथे पत्रकार परिषद घेऊन या फसवणुकीची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उर्वेला कॉलनी येथील सरीता कुंभारे या एजंट महिला व संस्थाचालक नवीनकुमार यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे.
केवळ पाच हजार रुपये शुल्क भरून बंगळुरूच्या महाविद्यालयात बीएससी नर्सिंग व जनरल नर्सिंग (जीएनएम)च्या कोर्सला प्रवेश करवून देण्याचे आमिष कुंभारे हिने परिसरातील विद्यार्थ्यांना दिले होते. त्यानुसार प्रगती नर्सिंग कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला. बंगळुरूला राहण्याची, जेवणाची सोय तसेच पुस्तक व गणवेशाच्या खर्चासाठी विद्यार्थ्यांकडून १०,००० रुपये घेण्यात आले. यानंतर मुलांच्या शिष्यवृत्तीतून कॉलेज उर्वरित खर्च करेल व मुलांना कुठलाही खर्च द्यावा लागणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र तीन महिन्यांतच अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्ष ८० हजार ते १ लाख रुपये भरण्याच्या सूचना महाविद्यालयाने केल्या. दुसरीकडे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणेही शक्य नसल्याचे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बीएससी नर्सिंगचे चार वर्षे व जीएनएमचा तीन वर्षाचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाखो रुपये भरावे लागणार आहेत. याबाबबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Low cost education, cheating of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.