कमी पटसंख्येच्या शाळांची झाली ‘आनंदी’ समूह शाळा; पहिला प्रयोग नंदुरबार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 06:33 AM2023-08-28T06:33:20+5:302023-08-28T06:35:53+5:30
आसपासच्या गावांतील अशा शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा (क्लस्टर) सुरू करण्याची योजना समग्र शिक्षा अभियानांतर्गत आखली आहे.
- मनोज मोघे
मुंबई : राज्यात १७ हजार ६०० शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी, एक किंवा दोन शिक्षक असल्याने या शाळांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. आसपासच्या गावांतील अशा शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा (क्लस्टर) सुरू करण्याची योजना समग्र शिक्षा अभियानांतर्गत आखली आहे.
याचा पहिला प्रयोग पुण्यातील पानशेत आणि नंदुरबारमधील तोरणमलमध्ये शिक्षण विभागाकडून राबविण्यात आला आहे. यामुळे आसपासच्या १० ते १२ गावांतील शाळा एकाच ठिकाणी भरत आहेत.
समूह शाळेतील सुविधा
समूह शाळांत चांगल्या सुविधा आणि शिक्षक असल्याने विद्यार्थीही आनंदाने शिक्षण घेतात, असे शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी सांगितले. पानशेतमधील समूह शाळेत १० किमी परिसरातील विद्यार्थी येतात. असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे म्हणाले.
सर्वेक्षणातून अखेर गुरुजींची सुटका
- राज्यातील १५ ते ३५ वयोगटातील निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याच्या अशैक्षणिक कामातून राज्यातील शिक्षकांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात होणारे नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचे काम आता शिक्षकांऐवजी स्वयंसेवी संस्थांवर सोपविण्यात आले आहे.
- अशैक्षणिक कामास जुंपल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट होती. त्यामुळे शिक्षण क्रांती संघटना तसेच इतर संघटनांनी शिक्षकांना या कामातून मुक्त करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर योजना शिक्षण संचालकांनी निर्णय घेतला आहे. योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.
स्वयंसेवी संस्थांवर जबाबदारी सोपविणार
निरक्षर सर्वेक्षण मोहिमेत जनगणना २०११ नुसार गावनिहाय निरक्षरांची संख्या तब्बल १ कोटी ६३ लाख इतकी आहे. या निरक्षर व्यक्तींना मार्च २०२७ अखेरपर्यंत साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे. या सर्वेक्षणासाठी विविध घटकांनी स्वयंसेवी पद्धतीने ऑनलाइन नोंदणीद्वारे सहभाग घेणे अपेक्षित आहे.
अशी स्थिती
१७,६००
शाळा या एक किंवा दोन शिक्षकी आहेत.
२० पेक्षा कमी विद्यार्थी यात शिक्षण घेत आहेत.
७,०००
शाळांत पाचपेक्षा
कमी विद्यार्थी.
५,०००
शाळांत १० पेक्षा
कमी विद्यार्थी.
काही शाळांत तर एक किंवा दोनच विद्यार्थी आहेत.