एसटीची अल्प भाडेवाढ
By admin | Published: May 20, 2014 03:46 AM2014-05-20T03:46:06+5:302014-05-20T03:46:06+5:30
एसटी महामंडळावर डिझेल दरवाढीचा मोठा आर्थिक भार पडला असल्याने महामंडळाने यातून बाहेर पडण्यासाठी २.५० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.
मुंबई : एसटी महामंडळावर डिझेल दरवाढीचा मोठा आर्थिक भार पडला असल्याने महामंडळाने यातून बाहेर पडण्यासाठी २.५० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. ही भाडेवाढ अल्प म्हणजे प्रति कि.मी. मागे २.५ पैसे इतकी असल्याचे सांगितले जाते. मात्र राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर ही भाडेवाढ होणार असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. डिझेलच्या दरात नुकतीच १ रुपये ९ पैसे दरवाढ करण्यात आली. यामुळे मुंबईत ६५ रुपये २१ पैसे तर तर ठाण्यात डिझेल ६५ रुपये १५ पैसे झाले. राज्यातील इतर ठिकाणीही डिझेलची किंमत एवढीच आहे. सध्या प्रत्येक दिवशी एसटी महामंडळाला ११ ते १३ लाख लिटर डिझेल लागते. यामुळे महामंडळावर २०० कोटींपेक्षा जास्त आर्थिक बोजा पडतो. डिझेलचे दर वाढल्याने यात महिन्याला आणखी चार कोटींचा बोजा पडणार आहे. हे पाहता महामंडळाने २.५० टक्के डिझेल दरवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार ही भाडेवाढ अल्प असणार असून, त्यामुळे प्रवाशांवर कुठलाही मोठा भार पडणार नसल्याचा दावा एसटीतील अधिकार्यांकडून केला जात आहे. भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाला वर्षाला तब्बल १०० कोटींचे उत्पन्न मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा प्रस्ताव लवकरच राज्य परिवहन प्राधिकरणाकडे जाणार असून त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतरच तो लागू केला जाईल, असेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)