दुर्मिळ घटना ! कमी दाबाच्या क्षेत्राचा बंगालचा उपसागर ते अरबी समुद्रापर्यंत प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 06:43 AM2020-10-15T06:43:09+5:302020-10-15T06:45:01+5:30
मुंबईसह कोकण, गुजरातच्या किनारपट्टी भागात १८ व १९ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता
विवेक भुसे -
पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाच्या क्षेत्राचा थेट अरबी समुद्रापर्यंत जाण्याची दुर्मिळ घटना यंदा प्रथमच घडत आहे. त्यामुळे ‘निसर्ग’ चक्रीवादळानंतर या हंगामात कोकणाला दुसऱ्यांदा चक्रीवादळा इतक्याच भयंकर पावसाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. १२ नोव्हेबर १९७७ नंतर तब्बल ४३ वर्षानंतर ही घटना घडत आहे.
बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशाच्या जवळ निर्माण झालेले हे कमी दाबाचे क्षेत्र १३ ऑक्टोबरला विशाखापट्टणम येथे किनारपट्टीवरुन पुढे सरकले. त्याने तेलंगणा, हैदराबादहून पुढे बुधवारी महाराष्ट्रात प्रवेश केला. ताशी २० किमी वेगाने ते पुढे सरकत आहे. सोलापूर मार्गे ते पुढे पुणेवरुन अरबी समुद्रात जाण्याची शक्यता आहे.
याबाबत ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे कमी दाबाचे क्षेत्र आता मध्य महाराष्ट्रापर्यंत आले आहे. ते गुरुवारी अथवा शुक्रवारी अरबी समुद्रात प्रवेश करेल. तेथे त्याला बाष्प मिळाल्याने त्याची तीव्रता आणखी वाढून ते उलटे फिरेल. त्यामुळे मुंबईसह कोकण, गुजरातच्या किनारपट्टी भागात १८ व १९ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कमी दाबाचे क्षेत्र हे जमिनीवर आल्यावर त्याला बाष्पाचा पुरवठा होत नसल्याने ते काही काळातच विरुन जाते. पण, गेल्या ३ महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने जमिनीत भरपूर ओलावा आहे. त्यामुळे या कमी दाबाच्या क्षेत्राला आवश्यक बाष्पाचा पुरवठा होत आहे़ त्यातूनच त्याचा प्रवास अरबी समुद्रापर्यंत होणार आहे.
यापूर्वी १२ नोव्हेबर १९७७ रोजी अशाच प्रकारची घटना घडली होती. चिन्नईजवळील नागापट्टणम येथे चक्रीवादळाने जमिनीवर प्रवेश केला व ते केरळला अरबी समुद्रात जाऊन मिळाले. तेथे त्याला अरबी समुद्रातून पुन्हा बाष्प मिळाल्याने त्याची तीव्रता आणखी वाढून ते उलट फिरले. त्यामुळे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर तेव्हा मुसळधार पाऊस पडला होता. त्यावेळचे चक्रीवादळ होते़ आताचे कमी दाबाचे क्षेत्र आहे.