४ लाख शेतकऱ्यांचा अल्पदरातील गहू साडेपाच महिन्यांपासून बंद, १४ जिल्ह्यांमध्ये फटका

By यदू जोशी | Published: October 21, 2022 02:06 PM2022-10-21T14:06:27+5:302022-10-21T14:07:31+5:30

राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील ४ लाख शेतकऱ्यांना अल्पदरात गहू देण्याची योजना साडेपाच महिन्यांपासून बंद पडली आहे. केवळ एक किलो तांदूळ तेवढा दिला जात आहे.

Low price wheat of 4 lakh farmers stopped for five and a half months affected in 14 districts in maharashtra | ४ लाख शेतकऱ्यांचा अल्पदरातील गहू साडेपाच महिन्यांपासून बंद, १४ जिल्ह्यांमध्ये फटका

४ लाख शेतकऱ्यांचा अल्पदरातील गहू साडेपाच महिन्यांपासून बंद, १४ जिल्ह्यांमध्ये फटका

googlenewsNext

यदु जोशी
 

मुंबई : राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील ४ लाख शेतकऱ्यांना अल्पदरात गहू देण्याची योजना साडेपाच महिन्यांपासून बंद पडली आहे. केवळ एक किलो तांदूळ तेवढा दिला जात आहे. या शेतकऱ्यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचाही लाभ मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील दारिद्र्य रेषेवरील आणि केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किलो तांदूळ देण्याची योजना आणली होती. एकूण पाच किलो धान्य दिले जायचे. काही जिल्ह्यांमध्ये ते प्रमाण तीन-दोन वा चार-एक असे होते. बहुतेक ठिकाणी चार किलो गहू दिले जात होते. महाविकास आघाडी सरकारमध्येही योजना कायम होती. त्यासाठीच्या धान्याची खरेदी ही राष्ट्रीय अन्न महामंडळाकडून (एफसीआय) केली जात होती.  मात्र, महाविकास आघाडी सरकार जाण्याच्या काहीच दिवस आधी एफसीआयकडून धान्य खरेदी न करता ती खासगी पुरवठादाराकडून खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एफसीआयने गहू पुरवठ्याबाबत असमर्थता दर्शविल्याने हा निर्णय घ्यावा लागला होता. एफसीआयचा पुरवठा बंद झाल्यानंतर आता पाच महिन्यांपासून केवळ एक वा काही ठिकाणी दोन किलो तांदूळ तेवढा पुरवला जात आहे. 

खरेदीही रेंगाळली

गेल्या काही महिन्यांतील अतिवृष्टी आणि त्यातून झालेल्या पीकहानीमुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे भीषण वास्तव समोर आलेले असताना दुसरीकडे सरकारने मदतीचा हात आखडता घेतला आहे. खासगी पुरवठादाराकडून गहू खरेदी करून पुरवठा पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या प्रक्रियेला गती न दिल्याने खरेदी रेंगाळली असल्याचे चित्र आहे.

दिवाळीनिमित्त चार खाद्यवस्तू १०० रुपयांत देण्याची योजना शिंदे सरकारने जाहीर केली आहे. आता बहुतेक जिल्ह्यांमधील गोदामांमध्ये या वस्तू पोहोचल्या असून वाटपही सुरू झाले आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. या खाद्यवस्तू एका पिशवीत देण्यात येणार असून, त्यावर आनंदाचा शिधा असे लिहिले आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत.

योजनेचे जिल्हावार लाभार्थी

औरंगाबाद ३५८०९१, जालना १४३०१२, नांदेड ३८४८६२, बीड ५५३५२६, उस्मानाबाद २५०८८१, परभणी २५३७८४, लातूर २९९९३६, हिंगोली १६१५२५, अमरावती ५०३४९९, वाशिम ९९७१३, अकोला १९२५५४, बुलडाणा ३७२०२३, यवतमाळ ३५८९९६, वर्धा ५६७८१.

Web Title: Low price wheat of 4 lakh farmers stopped for five and a half months affected in 14 districts in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.