राज्यातील १० जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊसमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 01:00 PM2020-06-29T13:00:34+5:302020-06-29T13:01:12+5:30
यंदा देशात पावसाला चांगली सुरुवात झाली असली तरी काही ठिकाणी अजून सरासरीपेक्षा कमी पाऊस
पुणे : केरळमध्ये वेळेवर आलेला मॉन्सून राज्यात काहीसा उशिरा आला तरी त्याने आपल्या नियोजित वेळेत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला़ आता त्याने संपूर्ण देश व्यापला आहे. यंदा देशभरात पावसाची चांगली सुरुवात झाली असली तरी राज्यात १० जिल्ह्यांमध्ये अजूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
तर १४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून ५ जिल्ह्यांत सरासरीच्या ६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.
राज्यात ११ जूनपासून पाऊस सक्रिय झाला आहे.त्यानंतर दोन-तीन दिवसांतच त्याने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला.असे असले तरी संपूर्ण राज्यात त्याचे वितरण आतापर्यंत तरी काहीसे विषम झाले आहे. नेहमी मराठवाड्यात पावसाच्या सुरुवातीला पाण्याचा तुटवडा जाणवत असतो. पण यंदा मराठवाड्यात सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला आहे़ मराठवाड्यातील नांदेडचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
याउलट उत्तर कोकणच्या काही भागात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी सातत्याने अतिवृष्टीचा तडाखा सहन करायला लागलेल्या पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी पाऊस पडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत पावसाने उच्चांक नोंदविला आहे. तेथे सरासरीच्या दुप्पटीहून अधिक ११३ टक्के पाऊस झाला आहे. अहमदनगरमध्ये २८ जूनपर्यंत सरासरी १०२ मिमी पाऊस पडतो़ तेथे आतापर्यंत २१७ मिमी इतका पाऊस झाला आहे.
राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे.मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा ५० टक्के अधिक, तर विदर्भात सरासरीइतका पाऊस झाला आहे.
सरासरीपेक्षा सर्वात कमी पाऊस झालेले जिल्हे (टक्के)
पालघर (-३५), अकोला (-३३), यवतमाळ (-२९), मुंबई उपनगर (-२३), मुंबई शहर
(-२१), रायगड (-१२), ठाणे (-९), गोंदिया (-१३), वर्धा (-८), गडचिरोली
(-४)
सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्के)
अहमदनगर (११३), सोलापूर (८५), औरंगाबाद (८४), बीड (७६), लातूर (७९)
सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेले जिल्हे (टक्के)
धुळे (५९), जळगाव (५७), कोल्हापूर (४४), नंदुरबार (२४), नाशिक (३५), पुणे (४८), सांगली (३०), हिंगोली (२७), जालना (५२),उस्मानाबाद (२७),परभणी (४४), बुलडाणा (२१), सिंधुदुर्ग (२३), वाशिम (४०)
सरासरी व त्यापेक्षा अधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्के)
रत्नागिरी (१४), सातारा (६), नांदेड (१०), अमरावती (१५), भंडारा (१७), चंद्रपूर (०), नागपूर (१६).