ढगाळ हवामानामुळे थंडीचा कडाका कमी
By admin | Published: November 2, 2016 12:42 AM2016-11-02T00:42:22+5:302016-11-02T00:42:22+5:30
कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला असून थंडीचा कडाका थोडा कमी झाला आहे़
पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला असून थंडीचा कडाका थोडा कमी झाला आहे़
नाशिक येथे गेले दोन दिवस किमान तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले होते़ मंगळवारी सकाळी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १३़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली तर, मध्य महाराष्ट्रात किंचित घट झाली़ उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़
पुणे शहरातील किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली होती़ गेल्या १० वर्षातील हे आॅक्टोंबरमधील सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले होते़ उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला असून मंगळवारी पुण्याचे किमान तापमानात १६़४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे़ पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून कमाल व किमान तापमान ३१ व १४ अंश सेल्सिअसपर्यंंत राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे़
पुढील २४ तासात दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़ ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.