खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला
By Admin | Published: April 14, 2017 02:27 AM2017-04-14T02:27:09+5:302017-04-14T02:27:09+5:30
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र स्टॉलधारकांकडून खाद्यपदार्थांचा दर्जा राखला जात नसल्याचे समोर आले
मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र स्टॉलधारकांकडून खाद्यपदार्थांचा दर्जा राखला जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने मध्य रेल्वेने स्टॉलधारकांविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. मध्य रेल्वेवरील ८५ पैकी ३५ स्टॉलधारकांवर दंड आकारण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे लांब पल्ल्याच्या २७ गाड्यांमधीलही पेण्ट्री कारची तपासणी करण्यात आली असता आठ गाड्यांमधील पेण्ट्री कारमध्ये खाद्यपदार्थाच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे आढळले. त्यामुळे कंत्राटदारांना चांगलीच जरब बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील स्थानकांवर असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील पदार्थांच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. अस्वच्छता, पदार्थांची चव बरोबर नसणे, पदार्थांचे दर अधिक असणे इत्यादी कारणांमुळे स्थानकांवरील स्टॉल नेहमीच चर्चेत राहतात. त्याविरोधात रेल्वे प्रशासनाकडे प्रवाशांकडून तक्रारीही केल्या जातात. याकडे गेल्या काही वर्षात दुर्लक्ष केले जात असतानाच मध्य रेल्वेवरील विभागीय रेल्वे व्यवस्थापकपदी नव्याने आलेल्या पंकज ऊके यांनी प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेतली. त्यानुसार १७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत स्टॉलधारकांवर कारवाईचे आदेश दिले.
या आदेशानंतर मध्य रेल्वेच्या मुंबईतील महत्वाच्या स्थानकातील ८५ स्टॉलची तपासणी केली. यातील ८५ स्टॉलपैकी ३५ स्टॉलधारकांनी नियमभंग केल्याचे आढळले. यामध्ये ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा, मुलुंड, भांडुप, डोंबिवली, कल्याण या स्थानकाचा समावेश आहे. या स्टॉलधारकांना ३१ प्रकारच्या कारणांसाठी दंड आकारण्यात आला आणि ८ लाख २0 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याचे ऊके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
लांब पल्ल्याच्या पेण्ट्री कारमध्येही नियमांचे उल्लंघन
२७ गाड्यांमधील पेण्ट्री कारची तपासणी केली असता आठ गाड्यांमध्ये खाद्यपदार्थांच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यांना १५ कारणांसाठी ९ लाख ५0 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
या कारणांसाठी कारवाई
- आरोग्यास हानिकारण खाद्यपदार्थ
- जादा दरात खाद्यपदार्थांची विक्री
- परवानगी नसलेल्या खाद्यपदार्थांची विक्री
- स्थानकातील स्टॉलमध्ये परवानगी नसताना सिलिंडरचा वापर