यंदा जुलैमध्ये 10 वर्षांतील सर्वाधिक कमी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 05:36 PM2017-08-02T17:36:10+5:302017-08-02T17:41:33+5:30
जुलै महिन्यात मुंबईत ८६९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण 2008 पासूनचे तिसर क्रमांकाचे सर्वात कमी प्रमाण आहे. तर यंदा 17 जुलै हा दिवस गेल्या तीन वर्षांतील सर्वात ओला दिवस ठरला आहे.
मुंबई, दि. 2 - जुलै महिन्यात मुंबईत 869.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण 2008 पासूनचे तिसर क्रमांकाचे सर्वात कमी प्रमाण आहे. तर यंदा 17 जुलै हा दिवस गेल्या तीन वर्षांतील सर्वात ओला दिवस ठरला आहे. सांताक्रूझ वेधशाळेनं 1 जून ते 31 जुलै या कालावधीत 1,3928 मि.मी. पावसाची नोंद केली. जून 2017 मध्ये 523.2 मि.मी. पाऊस झाला. तर यंदाचा 17 जुलै हा दिवस गेल्या तीन वर्षांतला सर्वात ओला दिवस ठरला आहे. तर मराठवाड्यात यंदा 1 जूनपासून जुलैअखेरपर्यंतच्या पावसात 21 टक्के तूट आहे.
तलावांमध्ये ८५ टक्के जलसाठा
दरम्यान, पाण्यासाठी वणवण करणा-या मुंबईकरांसाठी यंदाच्या मान्सूनने सुखद दिलासा दिला आहे. दोनच पावसाळी महिन्यांत मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये 85 टक्के जलसाठा जमा झाला आहे. वर्षभरासाठी पाण्याची कटकट मिटण्याकरिता आणखी अडीच लाख दशलक्ष लीटर जलसाठा जमा होण्याची गरज आहे.
सन २०१५मध्ये अपु-या पावसामुळे पाणीप्रश्न पेटला होता. गेल्या वर्षी मात्र तलावांमध्ये तुलनेत चांगला पाणीसाठा होता. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तलावांमधील जलसाठ्याची स्थिती उत्तम होती. त्यात मुसळधार सरी सतत तलाव परिसरात हजेरी लावत असल्याने पावसाळ्याच्या दीड महिन्यातच पाणीप्रश्न सुटला आहे. काही दिवसांतच सर्व धरणं भरून वाहण्याच्या स्थितीत आहेत. मुंबईला वर्षभर चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये 1 आॅक्टोबर रोजी 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे. मुसळधार पावसामुळे सर्व प्रमुख तलावांमध्ये एकूण 12 लाख 21 हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. 85 टक्के जलसाठा जुलै महिन्यातच जमा झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.