'निष्ठावंत शिवसैनिक तुमच्या दडपशाहीला बळी पडणार नाही'; ठाकरेंच्या खासदाराने ठणकावले!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 06:27 PM2024-01-18T18:27:55+5:302024-01-18T18:30:02+5:30
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी देखील राजन साळवी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे.
साडेतीन कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरुन उद्धव ठाकरे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी, तसेच त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम या तिघांविरुद्ध आज सकाळी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून, या विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण अधिक तपास करत आहेत.
राजन साळवी यांच्यावर केलेल्या कारवाईवर विरोधकांकडून विविध आरोप करण्यात येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी देखील राजन साळवी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत आमदार राजन साळवी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून केलेल्या आजच्या एसीबीच्या कारवाईचा मी धिक्कार करत आहे. कितीही त्रास झाला, तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडणार नाही असे ठणकावून सांगणाऱ्या राजन साळवींबद्दल आम्हाला अभिमान आहे, असं विनायक राऊत म्हणाले.
सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना जाणीवपूर्वक त्रास देऊन मिंधे गटामध्ये सामील होण्यासाठी अशी कपट कारस्थाने केली जात आहेत, असा आरोपही विनायक राऊतांनी केला आहे. तसेच एसीबीचे अधिकारी आणि सध्याचे सत्ताधारी यांना सांगतो की, राजन साळवी यांच्यासारख्या लाखो निष्ठावंतांच्या सामर्थ्यातूनच उद्याची शिवसेना उभी राहणार आहे. निष्ठावंत शिवसैनिक तुमच्या कोणत्याही दडपशाहीला बळी पडणार नाहीत, असं देखील विनायक राऊत यांनी ठणकावले आहे.
उद्धव ठाकरेंचा तातडीने राजन साळवींना फोन
एसीबीच्या कारवाईवर राजन साळवींची प्रतिक्रिया आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्याने आमची चौकशी सुरु झाली आहे. आम्ही कसे आहोत हे जनतेला माहिती आहे. माझ्या पाठिशी माझे मतदार आणि संपूर्ण जिल्हा आहे. हे अधिकारी कालच रत्नागिरीत दाखल झाले होते. मी तुरुंगात गेलो तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे साळवी म्हणआले. तसेच चौकशीचे परिणाम काय होऊ द्या, सामोर जाण्याची माझी तयारी आहे. माझ्या पक्षावर पूर्ण विश्वास आहे, असे राजन साळवी म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंनी मला तातडीने फोन केला. त्यांनी विचारपूस केली. राजन तुझ्या पाठिशी संपूर्ण महाराष्ट्र आहे. याचा मला अभिमान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.