LPG Gas Price Hike: "महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आलं अन् सिलेंडर ५० रूपयांनी वाढला"; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 02:08 PM2022-07-06T14:08:01+5:302022-07-06T14:09:15+5:30

"मविआ सरकार पाडण्यासाठी जो खर्च केला, तो गॅस दरवाढीतून वसूल करताय का? अशी जनतेच्या मनात शंका"

LPG Gas Cylinder Price Hike Sharad Pawar led NCP sarcastically slammed BJP Shinde Fadnavis government brutally trolled | LPG Gas Price Hike: "महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आलं अन् सिलेंडर ५० रूपयांनी वाढला"; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

LPG Gas Price Hike: "महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आलं अन् सिलेंडर ५० रूपयांनी वाढला"; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

LPG Gas Price Hike: राज्यात भाजपप्रणीत शिंदे-फडणवीस सरकार येते आणि तात्काळ ५० रुपयांची घरगुती गॅस सिलेंडर दरवाढ होते यावरुन जनतेने काय तो निष्कर्ष काढावा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये आज पुन्हा एकदा मोठी वाढ केली. आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल ५० रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे एका सिलेंडरसाठी आता मुंबईत १०५२.५० रुपये मोजावे लागणार आहेत. देशातील चार मोठ्या शहरांचा विचार केल्यास दिल्लीमध्ये एका सिलेंडरसाठी १०५३ रुपये, कोलकातामध्ये १०७९ रुपये, तर चेन्नईमध्ये १०६८.५० रुपये मोजावे लागणार आहेत. याच मुद्द्यावरून महेश तपासे यांनी सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले. 

राज्यात भाजपप्रणीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार येते. त्यानंतर लगेचच ५० रुपयांची घरगुती गॅस सिलेंडर दरवाढ होते यावरुन जनतेने काय तो निष्कर्ष काढला पाहिजे, असे महेश तपासे म्हणाले. एकीकडे महाविकास आघाडीतील ५० आमदार फोडले आणि दुसरीकडे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताच भाजपा सरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ५० रुपयांची दरवाढ केली आहे. आता याच काय अर्थ लावायचा तो जनतेनेच लावायला हवा. महाविकास आघाडीतील ५० आमदारांचे बंड आणि एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर लगेचच केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ५० रुपयांची दरवाढ केली आहे. दोन्हीकडे ५० हा आकडा काहीतरी संकेत देत आहे, अशी कोपरखळी महेश तपासे यांनी मारली.

"महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एक मोठ्या अदृश्य शक्तीने बंडखोर आमदारांवर जो काही खर्च केला असेल, तो खर्च गॅस दरवाढीतून वसूल केला जात आहे का? अशी शंका आता जनतेतून व्यक्त व्हायला लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचं सरकार आलंय आम्ही पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करु, असा दिलासा देण्याचे वक्तव्य केलेले आहे. असे असतानाच दुसरीकडे भाजपने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ केल्याने जनतादेखील आश्चर्य व्यक्त करत आहे", असेही महेश तपासे म्हणाले.

दरम्यान, घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली असली तरी व्यावसायिक (कमर्शियल) सिलेंडरच्या किमतीत मात्र कपात करण्यात आली आहे. १ जुलै रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत १९८ रुपयांनी कपात केली होती. त्यानंतर आता घरगुती सिलेंडरचे भावही कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र कंपन्यांनी सामान्य ग्राहकांना झटका देत भाव वाढवले. तर कमर्शियल सिलेंडर मात्र अजून आठ रुपयांनी स्वस्त केला. त्यामुळे आता मुंबईमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडर हा १९७२ रुपयांना मिळणार आहे.

Web Title: LPG Gas Cylinder Price Hike Sharad Pawar led NCP sarcastically slammed BJP Shinde Fadnavis government brutally trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.