मध्य रेल्वेच्या नियोजनाचा ‘एलटीटी-मडगाव’ला फटका
By Admin | Published: January 10, 2016 01:31 AM2016-01-10T01:31:53+5:302016-01-10T01:31:53+5:30
लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव वातानुकूलित डबलडेकरला मरेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका बसला आहे. या गाडीच्या वेळेदरम्यान दोन तासांच्या अंतराने कोकणात जाण्यासाठी
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव वातानुकूलित डबलडेकरला मरेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका बसला आहे. या गाडीच्या वेळेदरम्यान दोन तासांच्या अंतराने कोकणात जाण्यासाठी तब्बल तीन गाड्या उपलब्ध आहेत. आणि ही गाडी एलटीटीहून सुटत असल्याने गेल्या १४ फेऱ्यांमध्ये केवळ ८ वेळा ती ५० टक्क्यांहून अधिक भरली आहे. तर उर्वरित काळात या गाडीला ३० टक्केही प्रतिसाद मिळालेला नाही.
ही गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना ५ वाजता एलटीटी गाठावे लागत आहे. हा परिसर निर्मनुष्य असून येथे गुन्हे घडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्रवासी एलटीटीच्या वाट्याला जात नाहीत. मडगाव गाडीच्या पाच मिनिटे आधी दादरहून मडगावला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मडगावला पोहोचते. तर एलटीटीहून सुटणारी वातानुकूलित डबलडेकर गाडी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मडगावमध्ये दाखल होते. दुसरीकडे पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास दिवा-सावंतवाडी, ७ वाजता सीएसटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस अशा दोन गाड्यांचा पर्याय प्रवाशांसमोर खुला आहे. परिणामी, एलटीटीहून सुटणाऱ्या मडगाव गाडीची वेळ बदलण्यात यावी, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)