लुसी पोहचली अमेरिकेत, कौन्सीलेटकडून पोलिसाची प्रशंसा
By Admin | Published: July 27, 2016 02:30 AM2016-07-27T02:30:11+5:302016-07-27T02:30:11+5:30
पर्यटनाला आलेली एक विदेशी तरुणी ग्रामीण परिसरात उतरते. सोबत दुसरे कुणीही नसल्याने आणि भाषेची अडचण असल्याने ती गोंधळते. तशात तिची प्रकृती बिघडल्याने कावरीबावरी
>नागपूर : पर्यटनाला आलेली एक विदेशी तरुणी ग्रामीण परिसरात उतरते. सोबत दुसरे कुणीही नसल्याने आणि भाषेची अडचण असल्याने ती गोंधळते. तशात तिची प्रकृती बिघडल्याने कावरीबावरी झालेल्या या तरुणीभोवती सडकछाप मजनू गोळा होतात. प्रकरण भलत्याच वळणावर जाण्याचे संकेत असतानाच एक सदगृहस्थ पोलिसांना कळवितो. लगेच पोलीस पोहचतात. तरुणीला पोलीस ठाण्यात आणून तिच्यावर प्रथमोपचार करून तिची वास्तपूस्त केली जाते. दिलासा मिळाल्यामुळे तिही सावरते. नाव, गाव, पत्ता, नातेवाईकांचा संपर्क क्रमांक कळविला जातो. पोलीस लगेच अमेरिकेन दुतावासाच्या माध्यमातून तिच्या आईशी संपर्क करतात. तिची आई नागपुरात येईपावेतो तिला एका हॉटेलमध्ये ठेवले जाते. आई येते, तरुणीला पोलीस तिच्या आईच्या हवाली करतात. मायलेकी पोलिसांचे आभार मानत अमेरिकेत निघून जातात. एका प्रकरणाचा सुखद शेवट होतो. हा प्रकार म्हणजे कुण्या चित्रपटातील प्रसंग नव्हे. ही रियल स्टोरी आहे. दीड महिन्यापूर्वी कळमन्यात घडलेली!
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणारी लुसी चेन (वय २२) ही तरुणी जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दीड महिन्याच्या पर्यटनाला आली. दिल्लीहून ती बेंगरुळू येथे गेली. तेथील हॉटेलमध्ये काही दिवस मुक्काम केल्यानंतर विपश्यनेसाठी ती रायपूरला (छत्तीसगड) येथे गेली. पासपोर्ट, व्हीजासह महत्वाचे कागदपत्रे आपण बेंगरूळू येथेच राहून गेल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे रायपूरहून ती नागपूर मार्गे पुन्हा बेंगरुळूला जायला निघाली. बसने येताना चुकून ती पारडीत (नागपूर समजून) उतरली. बराच वेळ ईकडे तिकडे फिरल्यानंतर आपण हरविल्याचे (वाट चुकल्याचे) तिच्या लक्षात आले. पारडीच्या ग्रामीण भागाचे वातावरणही तिची प्रकृती बिघडवणारे ठरले. कावरीबावरी झालेल्या लुसीला पाहून काही सडकछाप मजनू तिच्या अवतीभवती घुटमळू लागले. भाषेची मुख्य अडचण असल्याने लुसी चांगलीच गोंधळली. तिची ही अवस्था पाहून एका सदगृहस्थाने कळमना पोलिसांना फोन केला. सहायक निरीक्षक धर्मेंद्र आवारी आणि प्रिती यादव नामक कर्मचा-यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन लुसीला ठाण्यात आणले. ठाणेदार सुनील बोंडे यांनी तिची वास्तपुस्त केली. तिच्यावर प्रथमोपचार केले. त्यामुळे लुसीला हिम्मत मिळाली. तिने आपले नाव, गाव, पत्ता सांगून आईचा मोबाईल क्रमांकही कळविला. बोंडे यांनी लगेच ही माहिती वरिष्ठांच्या माध्यमातून अमेरिकन दुतावासातर्फे लुसीच्या आईला कळविली. लुसीची आई लॉस एंजेलिसवरून लगेच दिल्लीत आणि नंतर नागपुरात कळमना ठाण्यात पोहचली. तोपर्यंत लुसीचा मुक्काम कळमना मार्केटजवळच्या एका हॉटेलात होता. लुसीला पाहताच तिची आई तिला घट्ट बिलगली. लुसीने रडतच आपली प्रवास यात्रा आणि कळमना पोलिसांचा सौजन्यपूर्ण व्यवहार आईला सांगितला. कळमना पोलिसांनी नंतर या दोन मायलेकींना बेंगरुळू येथे हरविलेले लुसीचे कागदपत्र मिळवून देण्यासही मदत केली. पोलिसांचे आभार व्यक्त करत अमेरिकन मायलेकी १८ जूनला आपल्या देशात परतल्या.
कौन्सिलेट जनरलने घेतली दखल
लुसी अमेरिकन उद्योजकांच्या परिवारातील आहे. तिच्या आईने हा प्रकार अमेरिकन दुतावासाला सांगून कळमना पोलिसांच्या आदरातिथ्याची माहिती कळविली. त्याची दखल घेत कौन्सिलेट जनरल आॅफ द युनायटेड स्टेटस् आॅफ अमेरिकाचे कौन्सिल जनरल थॉमस वाज्डा यांनी २० जून रोजी कळमना पोलीस ठाण्याला एक पत्र पाठविले. दोन दिवसांपूर्वी हे पत्र पोलिसांना प्राप्त झाले. त्यात अमेरिकन कौन्सिलने शहर पोलिसांच्या कार्यशैलीची प्रशंसा करून त्यांचे आभारही मानले आहे.