वाशिम जि.प मधील प्रसाधनगृह कुलूपबंद
By admin | Published: July 21, 2014 11:12 PM2014-07-21T23:12:35+5:302014-07-21T23:12:35+5:30
जिल्हा परिषदेच्या इमारतीतील शौचालये व मुत्रीघरांमध्ये पाण्याअभावी दुर्गंंधी पसरली आहे. दुर्गंंधी येत असल्याने अनेक प्रसाधनगृहाला कुलूप लागले आहे.
वाशिम: जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हयात संपुर्ण स्वच्छता अभियान राबवून घरोघरी शौचालये बांधण्यास व त्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते. दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या इमारतीतील शौचालये व मुत्रीघरांमध्ये पाण्याअभावी दुर्गंंधी पसरली आहे. दुर्गंंधी येत असल्याने अनेक प्रसाधनगृहाला कुलूप लागले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मजल्यावर किमान चार याप्रमाणे तीन मजल्यावर १२, सभागृहाशेजारी एक अशी १३ शौचालये व मुत्रीघरे आहेत. या इमारतीला जुन्या जिल्हापरिषद इमारतीमधुन पाणीपुरवठयाची व्यवस्था केलेली आहे. परंतु तेथून येणारे पाणी इमारतीच्या टाक्यात पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही. त्यामुळे या शौचालयात व मुत्रीघरात पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे तेथील स्वच्छता योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे या शौचालयाच्या व मुत्रीघरांच्या जवळ असलेल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांना दुर्गंंधीचा सामना करावा लागत असल्याने शौचालयाला व स्वच्छता गृहाला कुलूपच लावून टाकले आहे. संबंधितांनी लक्ष देवून वेळोवेळी स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.