‘लूक पापा..आय अॅम फ्री नाऊ’
By Admin | Published: February 26, 2016 04:44 AM2016-02-26T04:44:27+5:302016-02-26T08:25:46+5:30
गुरुवारी अभिनेता संजय दत्त याने पत्रकार परिषद घेण्यापूर्वी काही क्षण आकाशाकडे पाहत असे म्हटले. दुपारी दीडच्या सुमारास संजय मुंबईच्या निवासस्थानी दाखल झाला. या दरम्यान
मुंबई : ‘लूक पापा..आय अॅम फ्री नाऊ’... गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी अभिनेता संजय दत्तने काही क्षण आकाशाकडे पाहत असे उद्गार काढले. दुपारी दीडच्या सुमारास संजय मुंबईच्या निवासस्थानी दाखल झाला. या दरम्यान त्याने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. आई नर्गिसच्या कब्रलाही त्याने भेट दिली.
पत्रकार परिषदेत संजय दत्तसोबत त्याची पत्नी मान्यता, इकारा आणि शाहरान ही अपत्ये उपस्थित होती. या वेळी संजय म्हणाला, ‘२३ वर्षांनंतर मला ‘आझाद’ झाल्यासारखे वाटतेय. वडिलांची खूप आठवण येते आहे. मी केवळ बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी आहे, त्याची शिक्षा पूर्ण केली. माझे देशावर खूप प्रेम आहे. मी माझा देश सोडून कुठेही जाणार नाही. तिरंगा माझा अभिमान आहे. त्यामुळेच मी माझी शिक्षा पूर्ण केली,’ असेही त्याने सांगितले.
तुरुंगात कमाविलेल्या पैशांचे काय केले, असे विचारले असता, एका चांगल्या नवऱ्याप्रमाणे पैसे पत्नीकडे दिल्याचे गंमतीशीर उत्तर त्याने दिले. या वेळी तुरुंगातील अखेरच्या क्षणांबद्दल सांगताना संजय म्हणाला की, ‘चार दिवसांपासून मी काही नीट खाल्ले नाही. काल रात्री झोपही लागली नाही. केव्हा तुरुंगाबाहेर जातो, हेच विचार वारंवार मनात रेंगाळत होते. तुरुंगात रेडिओ जॉकी म्हणून काम करताना, सहकारी समीर इंगळे, गोट्या मामा आणि कुरेशी चांगले मित्र झाले,’ अशी आठवण संजयने आवर्जून सांगितली.
मी दहशतवादी नाही...
‘मी दहशतवादी नाही’ हे ऐकण्यासाठी माझे वडील पाहिजे होते, असे संजयने आवर्जून म्हटले. वडिलांना हे शब्द ऐकण्याची फार उत्सुकता होती. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.
बेटर नव्हे ‘बेस्ट हाफ’
मी तुरुंगात असताना माझ्या पत्नीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आमचे कुटुंब सांभाळले. अशी परिस्थिती कुणावर येऊ नये, अशी मी प्रार्थना करतो. मान्यता माझी ‘बेटर’ नाही, तर ‘बेस्ट हाफ’ आहे, असे सांगत, पत्नीविषयी प्रेमही संजयने अधोरेखित केले.
सलमान मेरा छोटा भाई
‘सलमान खान मेरा छोटा भाई है, हमेशा रहेगा. उसके सब प्रॉब्लेम सॉल्व्ह हो,’ अशी भावना संजय दत्तने या वेळी व्यक्त केली.
बॉलीवूडकरांनी केले
‘वेलकम बॅक’
संजय दत्तच्या सुटकेने आनंदित झालेल्या बॉलीवूडमधील सेलिब्रिटींनी, आपला आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला. गुरुवारी दिवसभर टिष्ट्वटरवर अभिनेत्री जुही चावला, अभिनेता ऋषी कपूर, दिग्दर्शक सतीश कौशिक आणि महेश भट्ट अशा बड्या सेलिब्रिटींनी संजय दत्तला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा देत, ‘वेलकम बॅक’ म्हटले.
वार्तांकनाच्या वेळी ११ मोबाइल चोरीला
अभिनेता संजय दत्त याच्या परतीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचे तब्बल ११ मोबाइल चोरीला गेल्याची घटना गुरुवारी घडली. मोबाइल चोरीला गेलेल्या पत्रकारांमध्ये वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि कॅमेरामॅनचा समावेश आहे. या प्रकरणी प्रतिनिधींनी खार पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्यानुसार, अधिक तपास सुरू आहे, असे खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी सांगितले.