बोल की लब आझाद है तेरे...
By admin | Published: November 24, 2015 03:05 AM2015-11-24T03:05:00+5:302015-11-24T03:06:29+5:30
बोल की लब आजाद हैं तेरे, बोल जबाँ अब तकतेरी है... शायर फैैज अहमद फैैज यांची कविता सादर करीत शबाना आझमी यांनी साहित्यिक, कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला साद दिली.
पुणे : बोल की लब आजाद हैं तेरे, बोल जबाँ अब तकतेरी है... शायर फैैज अहमद फैैज यांची कविता सादर करीत शबाना आझमी यांनी साहित्यिक, कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला साद दिली. निमित्त होते, लोकमत माध्यम समूहाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मोहर ग्रुप प्रस्तुत लोकमत साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे.
पुण्यातील मान्यवर साहित्यरसिकांच्या उदंड प्रतिसादात हा सोहळा रंगला. या वेळी सन्माननीय अतिथी म्हणून शबाना आझमी बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे, नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक अजय अंबेकर, मोहर ग्रुपचे अध्यक्ष व घुमानमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, लोकमतचे संपादक विजय बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
हा सर्जनाचा, विचारांचा उत्सव - विजय दर्डा
खासदार विजय दर्डा म्हणाले, लोकमत साहित्य पुरस्कार हा सर्जनाचा, विचारांचा उत्सव आहे. विविध क्षेत्रांत जे जे उत्तम आहे ते ते वाढावे अशी लोकमतची भूमिका आहे. त्या पार्श्वभूमीवर हे लोकमतचे पुरस्कार वितरणाचे तिसरे पर्व आहे. पुरस्कार वापसीच्या दिवसांत हे लोकमतचे पुरस्कार दिले जात आहेत. परंतु पारदर्शक पद्धतीने हे पुरस्कार दिले जात असल्याने ते कुणीही परत करणार नाही. या साहित्य पुरस्कारांच्या माध्यमातून मराठीला नवी दिशा मिळेल असा विश्वास मला वाटतो.