म. फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विश्वनाथ यांची नियुक्ती
By admin | Published: December 29, 2015 01:43 AM2015-12-29T01:43:31+5:302015-12-29T01:43:31+5:30
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी बंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. के. पी. विश्वनाथ यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल आणि
अहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी बंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. के. पी. विश्वनाथ यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल आणि कुलपती डॉ. विद्यासागर राव यांनी सोमवारी डॉ. विश्वनाथ यांच्या नावाची घोषणा केली. ही नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी आहे.
विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांचा कार्यकाल ३० डिसेंबर २०१५ रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू होती. कुलगुरुपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या निवड समितीकडे ४२ अर्ज दाखल झाले होते. अर्जांची छाननी करून १५ जणांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते. त्यातून समितीने राज्यपालांकडे पाच जणांची शिफारस केली होती. त्यामध्ये चारही नावे परराज्यातील, तर एक नाव राज्यातील होते. पाच उमेदवारांची मुलाखत घेतल्यानंतर सोमवारी राज्यपालांनी बंगळुरू येथील डॉ. विश्वनाथ यांची कुलगुरुपदावर नियुक्ती केल्याची घोषणा केली. डॉ. विश्वनाथ यांनी बंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठातून एम. एस्सी. (कृषी) व पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. तामिळनाडू येथील अन्नमलाई विद्यापीठातून त्यांनी ‘बौद्धिक मालमत्ता’या विषयातही पीएच.डी. पदवी मिळविली आहे. डॉ. विश्वनाथ यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९५६ रोजी झाला असून, त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन या क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. दरम्यान, धुळे, जळगाव, नंदूरबारसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठाचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळे राहुरी येथील विद्यापीठाच्या विभाजनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यापीठ विभाजनाचे आव्हान नव्या कुलगुरुंपुढे आहे. (प्रतिनिधी)