‘एम. एस. धोनी’ला करमाफी
By admin | Published: October 7, 2016 03:28 AM2016-10-07T03:28:43+5:302016-10-07T03:28:43+5:30
आठ दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या हिंदी चित्रपटामुळे देशातील तरुण पिढीला क्रीडा क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करण्याची प्रेरणा
पुणे : आठ दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या हिंदी चित्रपटामुळे देशातील तरुण पिढीला क्रीडा क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणार असल्याने शासनाने या चित्रपटाला करमणूक कर माफ केला आहे. यामुळे आता या चित्रपटाच्या तिकिटाचे दर ४० टक्क्यांनी कमी होणार आहे.
एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जागतिक दर्जाचा खेळाडू बनण्याकरिता आवश्यक असलेले उच्च ध्येय, कठीण परिश्रम, धाडस, सबुरी, जिद्द व चिकाटी यासारख्या मानवी व सामजिक मूल्यांबाबचे महत्त्व या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. तसेच, क्रीडा क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करण्यास भारतातील तरुण पिढीला प्र्रेरित करणारा हा चित्रपट भारताच्या क्रिकेट संघाचे कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनी यांच्या जीवनावर आधारित ‘एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ हा हिंदी चित्रपट आहे.
पुण्यासह राज्यातील सर्व चित्रपटगृहामध्ये २३ सप्टेंबर रोजी ‘एम. एस. धोनी..’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत तब्बल शंभर कोटी रुपयांची कमाईदेखील केली आहे. आता नागरिकांना शंभर रुपयांचे तिकीट ७४ रुपयांनाच मिळणार असल्याचे करमणूक कर अधिकारी सुषमा पाटील-चौधरी यांनी सांगितले.