एमए, बीएड तरु णाची शेतीला पसंती
By Admin | Published: March 1, 2016 01:51 AM2016-03-01T01:51:36+5:302016-03-01T01:51:36+5:30
मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्यालगत वसलेल्या दूधनोली या आदिवासी गावातील दीपक नामदेव घिगे या सुशिक्षित तरु णाने नोकरीपेक्षा आधुनिक शेतीतून चांगले उत्पन्न घेण्याला पसंती दिली आ
धसई : मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्यालगत वसलेल्या दूधनोली या आदिवासी गावातील दीपक नामदेव घिगे या सुशिक्षित तरु णाने नोकरीपेक्षा आधुनिक शेतीतून चांगले उत्पन्न घेण्याला पसंती दिली आहे.
त्याने इतिहास विषयात एमए, बीएड शिक्षण घेतले आहे. परंतु, शिक्षण क्षेत्रातील परिस्थितीचा विचार करून शेतीत स्वत: राबून नवनवीन पिके घेण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्याने आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर यांच्याकडून अनुदान घेऊन शेततळे तयार केले आहे. तसेच विहीर, बोअरवेल यांचाही पाण्यासाठी वापर करून आधुनिक पद्धतीने ठिबक सिंचनचा वापर करून पाणीबचत करून एक हेक्टर जमिनीत काकडी, दीड एकर जमिनीत भेंडी, २० गुंठे जमिनीत टोमॅटो ही पिकेघेण्यास सुरुवात केली आहे. तसेच सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर यासारखी अंतर्गत पिके घेऊन उत्पन्नात भर घातली आहे.
यात चार महिन्यांमध्ये काकडीपासून पाच लाख, भेंडीपासून एक लाख व टोमॅटोपासून दीड लाख रु पये उत्पन्न अपेक्षित आहे. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्याने पाण्याच्या बचतीसह मजुरीची बचत होते. या आधुनिक पद्धतीने भाजीपाला पिकवताना खर्च वजा करता सर्व उत्पन्नातून चार महिन्यांत पाच लाख रुपये निव्वळ उत्पन्न अपेक्षित आहे. या शेतीसाठी त्याने स्वत: सेंद्रिय पद्धतीचा वापर केला आहे. यासाठी गोमूत्र, दशपर्णी अर्क तयार करून त्याचा या भाजीपाला पिकांसाठी वापर केला आहे. तसेच कडुलिंबाच्या बिया, पाने कुजवून त्यापासून निंबोळीचा अर्क स्वत: तयार करून तसेच शेणखताचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने पिके घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्याने स्वत: शेतीविषयक माहितीचा अभ्यास करून या आधुनिक शेतीला पसंती दर्शवली आहे.