‘मा. गो. वैद्यांचे वय औषधाच्या गोळ्या खाण्याचे’
By admin | Published: April 11, 2016 02:57 AM2016-04-11T02:57:43+5:302016-04-11T02:57:43+5:30
‘महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याची भाषा करणारे मा. गो. वैद्य मराठी माणसाच्या मनातून उतरलेलेच आहेत. त्यामुळे कुणी पिस्तूल झाडण्याची गरज नाही
मुंबई : ‘महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याची भाषा करणारे मा. गो. वैद्य मराठी माणसाच्या मनातून उतरलेलेच आहेत. त्यामुळे कुणी पिस्तूल झाडण्याची गरज नाही. तसेही मा. गो. वैद्यांचे वय आता बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा औषधाच्या गोळ्या घेण्याचे झाले आहे. याचे भान त्यांनी ठेवावे,’ असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाणला आहे.
‘पृथ्वीपासून स्वतंत्र व्हायची वेळ आली, तरी वेगळा विदर्भ मागतायत,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत मा. गो. वैद्यांवर टीका केली होती. मा. गो. वैद्य यांनीही राज ठाकरेंनी मारेकऱ्यांकरवी माझी हत्या घडविली नाही तर शंभरी पार करेन, असे सांगत पलटवार केला होता. रविवारी मनसेने प्रसिद्धी पत्रकातून मा. गो. वैद्य यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
भाषा, संस्कृती, लोकभावनेच्या आधारावर देशात राज्यांची निर्मिती करण्यात आली. प्रशासकीय काम अथवा लोकसंख्यचे गणित यामागे नव्हते. ५० लाख लोकसंख्येचे राज्य निर्माण करून महापालिकांचे संघराज्य करायचे आहे का? राज्ये सोयीसाठी लहान करा म्हणणारे वैद्य उद्या देश मोठा असल्याने लोकांच्या सोयीसाठी तो लहान करा, अशी मागणी करणार का, असा सवाल मनसे प्रवक्ता अनिल शिदोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.