मोबाइल चार्जिंगसाठी मैलभर पायपीट

By admin | Published: November 15, 2015 02:24 AM2015-11-15T02:24:20+5:302015-11-15T02:24:20+5:30

सातपुड्यातील आदिवासी अन् पायपीट ठरलेली आहे. कधी पोटाची खळगी भरण्यासाठी, तर कधी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील किंवा जिल्हा कचेरीच्या ठिकाणी त्यांना फेरफटका मारावा लागतो

Mackerel footpath for mobile charging | मोबाइल चार्जिंगसाठी मैलभर पायपीट

मोबाइल चार्जिंगसाठी मैलभर पायपीट

Next

रमाकांत पाटील,  नंदुरबार
सातपुड्यातील आदिवासी अन् पायपीट ठरलेली आहे. कधी पोटाची खळगी भरण्यासाठी, तर कधी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील किंवा जिल्हा कचेरीच्या ठिकाणी त्यांना फेरफटका मारावा लागतो. स्वातंत्र्यानंतर सहा दशके लोटल्यानंतरही दळणवळणाची साधने न पोहोचलेल्या भागात सध्या मोबाइलचे टॉवर पोहोचल्याने संपर्काचा बोलबाला वाढलाय. मात्र, वीज न पोहोचल्याने आदिवासींना चार्जिंगसाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे.
सातपुड्यातील धडगाव, अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यातील जवळपास ७० पेक्षा अधिक गावे आणि एक हजारांवर पाड्यांपर्यंत रस्तेच नाहीत, तर इतर सुविधांबाबत न बोललेलेच बरे. काही मध्यवर्ती गावांपर्यंत मोबाइलचे टॉवर पोहोचल्याने, त्याच्या परिसरातील पाड्यांवर तरुणांच्या हातात मोबाइल फोन दिसू लागले आहेत. मात्र, वीज नसल्याने चार्जिंगचा मोठा प्रश्न येथे आहे.
सातपुड्यातील कंजाला, कौवलीमाळ, सिंदगव्हाण, जांगठा या चार गावांसह नर्मदा काठावरील गावे आणि ७०० च्या वर पाड्यात अजून वीज पोहोचलेली नाही. काही गावांत वीज पोहोचली, पण तांत्रिक अडचणी सातत्याने उद्भवत असल्याने, अनेक ठिकाणी बहुसंख्य वेळ वीजपुरवठा खंडितच असतो. त्यामुळे मोबाइलधारक चार्जिंगसाठी मध्यवर्ती गावात येतात. हे नित्याचेच झाले आहे. मोलगी, धडगाव, अक्कलकुवा गावांमध्ये रोज वाड्या-वस्त्यांवरून मोबाइल चार्जिंग करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
मोबाइल चार्जिंगमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. गावांमधून दोन-चार तरुण केवळ मोबाइल चार्जिंग करण्यासाठी मध्यवर्ती गावांमध्ये जातात. अनेक गावांना रस्ते नसल्याने या तरुणांना पाच ते १० किलोमीटरची पायपीटही करावी लागते. हे तरुण गावातील मोबाइल एकत्र करून घेऊन येतात. त्याचा त्यांना मोबदलाही मिळतो, तर दुसरीकडे मोलगी, धडगाव, अक्कलकुवा या गावांमध्ये काही व्यावसायिकांनी मोबाइल चार्जिंग करून देण्याचा व्यवसायच सुरू केला आहे.
प्रत्येक मोबाइल चार्जिंगसाठी १० ते १५ रुपये आकारले जातात. या व्यावसायिकांकडे एकाच वेळी १० ते १५ मोबाइल चार्जिंग करण्याची सुविधा आहे.
माझ्या बर्डीपाडा गावात वीज नसल्याने मोबाइल चार्जिंगसाठी जवळपास १५ ते २० किलोमीटर लांब मोलगीला यावे लागते. त्यासाठी दिवस वाया जातो. त्यामुळे गावातील मोबाइल धारकांनी गट तयार केला असून, सर्वांचे मोबाईल एकत्र करून आम्ही चार्जिंगला पाठवतो.
- रमेश तडवी, बर्डी, ता.अक्कलकुवा

Web Title: Mackerel footpath for mobile charging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.