विक्रेते, दलालांकडून लूट; ‘मेड इन धारावी’ माल चढ्या दराने बाजारात, १२० ते २५० रु.चे पीपीई किट दीड हजाराला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 03:04 AM2020-10-21T03:04:04+5:302020-10-21T07:15:06+5:30
धारावीत सध्या पीपीई कीट बनविणारे १५ ते २० कारखाने सुरु आहेत. सगळ्यांचे दर जवळपास सारखेच. तुम्ही बनवलेले पीपीई कीट व्यापारी हजार ते दीड हजाराचे लेबल लावून विकतात तेव्हा वाईट वाटत नाही का? असे विचारले असता राजेश म्हणाले, ‘हम क्या कर सकते है...
अतुल कुलकर्णी
मुंबई : धारावीत बनवून घेतलेले १२० ते २५० रुपयांचे पीपीई कीट खुल्या बाजारात हजार दीड हजाराला एक विकण्याचा गोरखधंदा रोजरोस सुरु आहे. ‘मेड इन धारावी’ कीटला कंपन्यांचे लेबल लावून बाजारात ते अव्वाच्या सव्वा किमतीला विकले जात आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या ‘रियालिटी चेक’मध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
कोरोनामुळे सध्या पीपीई कीटची मागणी वाढली आहे. नामांकित कंपन्यांचे लेबल असलेले कीट्स धारावीत बनत असल्याची माहिती मिळताचा आम्ही थेट धारावी गाठली. तेथे पीपीई कीट सगळ्यात आधी ज्यांनी बनवायला सुरुवात केली त्या बिहारच्या राजेश केवठ यांना गाठले. ते म्हणाले, ‘कारागिर बसून होते, पैसा नव्हता. मी ज्या भाड्याच्या खोलीत रहात आहे, त्याचे मालक डॉ. फारुखी यांनी पीपीई कीट बनवण्याचा सल्ला दिला. आधी १०० कीट बनवून डॉक्टरांना दिले. सगळ्यांनीच त्याचे कौतूक केल्यावर थेट अहमदाबादहून नवनोन नावाचे यासाठी लागणारे कापड मागवले’, राजेश सोबत २५ कारागिर आहेत. आठ तासाची एक अशा दोन शिफ्टमध्ये १५ मशिनच्या सहाय्याने त्यांनी काम सुरु केले. रोज एक हजार कीट बनवायचे. चाळीस, साठ, सत्तर आणि नव्वद जीएसएम असे त्याचे प्रकार आहेत. केशकर्तनालयात २० जीएसएमचे देखील पीपीई कीट दिले. ज्याची किंमत ७० रुपये आहे. बाकीच्या किंमती १२० ते २५० रुपयांपर्यंत आहेत.
धारावीत सध्या पीपीई कीट बनविणारे १५ ते २० कारखाने सुरु आहेत. सगळ्यांचे दर जवळपास सारखेच. तुम्ही बनवलेले पीपीई कीट व्यापारी हजार ते दीड हजाराचे लेबल लावून विकतात तेव्हा वाईट वाटत नाही का? असे विचारले असता राजेश म्हणाले, ‘हम क्या कर सकते है... दुख तो होता है साब... पण आज आमच्या हाताला काम मिळत आहे, आमचा खर्च भागतोय, उपाशी राहण्याची वेळ येत नाही हे काही कमी नाही...’मास्क बनवण्याचे कामही यांनी केले आहे. आयपीएलसाठी ‘रॉयल ग्रीन’ असे लोगो छापून त्यांनी अत्यंत दर्जेदार असे १ लाख मास्क बनवून दिले. १५ रुपयांना एक मास्क त्यांनी नफ्यासह विकला. आज बाजारात त्याच दर्जाचा मास्क किमान दीडशे ते दोनशे रुपयांना विकला जात आहे.
दीडशेचे किट दोन हजारांत
चेतना कॉलेजमधून बी.कॉम.ची पदवी घेतलेल्या नंदकुमार सोनवणे यांचा मूळ व्यवसाय कारखान्यांसाठी सुरक्षा वस्तू बनवण्याचा. कोरोनामुळे कारखाने बंद पडले व ते पीपीई कीट व मास्क बनवू लागले. ‘आम्ही स्वत: काही हॉस्पीटलना आमचे कीट नाममात्र दरात विकत घ्या असे सांगितले पण कोणी आम्हाला दारात पण उभे केले नाही. मात्र आमच्याकडून दीडशे ते अडीचशे रुपयांना पीपीई कीट नेऊन त्याच हॉस्पीटलना हजार दोन हजारांना विकले गेले. काहींनी तर मेक इन इंडियाचा लोगो पण लावून घेतल, असे सोनवणे यांनी सांगितले.