‘माळेगाव’ ऊस उत्पादकांना प्रतिटन २०० रुपये मिळणार
By admin | Published: June 7, 2017 01:33 AM2017-06-07T01:33:59+5:302017-06-07T01:33:59+5:30
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ऊस विकास संवर्धन अनुदान अंतर्गत सभासद आणि गेटकेनधारकांना २०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय आज घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ऊस विकास संवर्धन अनुदान अंतर्गत सभासद आणि गेटकेनधारकांना २०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय आज घेतला.
कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी सांगितले की, यापूर्वी कारखान्याने २३९६ रुपये सभासदांना दिले आहेत. आता त्यामध्ये ऊस विकास संवर्धन अनुदान अंतर्गत २०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. दिवाळी अॅडव्हान्स म्हणून १५४ रुपये प्रतिटन देण्यात येणार आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना जिल्ह्यासह राज्यात दर देण्यामध्ये अग्रक्रमांकावर
राहिला आहे. अनेक राजकीय अडचणी आलेल्या असतानादेखील कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगाम यशस्वी पार पाडला. कारखान्याच्या सभासदांना सर्वाधिक दर देण्याची परंपरा पार पडली. कारखान्यात सत्तांतर झाल्यानंतर गोदाम, इथेनॉल ईव्हॉपोरेशन प्रकल्पासह अन्य प्रकल्प राबविण्यात आले. सहवीज निर्मितीसह अन्य उपपदार्थ निर्मिती प्रकल्प असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा दर देणे शक्य झाले, असे तावरे यांनी सांगितले.
कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे आणि त्यांच्या संचालक मंडळाने यापूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २०० रुपये ऊस विकास संवर्धन अंतर्गत प्रतिटन देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील अन्य कारखान्यांच्या तुलनेत माळेगावचा दर सर्वाधिक आहे. हा निर्णय
सर्वांना दिलासा देणारा
ठरणार आहे.