मदयधुंद पित्याने धुळयात मुख्याध्यापकाला मारहाण!
By admin | Published: October 21, 2016 09:54 PM2016-10-21T21:54:41+5:302016-10-21T21:54:41+5:30
शहरातील धुळे एज्युकेशन सोसायटीच्या रामचंद्र केशव चितळे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी मुलीची छेड काढल्याने पित्याने मदयधुंद अवस्थेत शाळेच्या मुख्याध्यापकास मारहाण केल्याची घटना
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. २१ : शहरातील धुळे एज्युकेशन सोसायटीच्या रामचंद्र केशव चितळे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी मुलीची छेड काढल्याने पित्याने मद्यधुंद अवस्थेत शाळेच्या मुख्याध्यापकास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली़ या प्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे़ तर दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ राज्य शिक्षक परिषदेतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले़
देवपूरातील रामचंद्र केशव चितळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनारसिंग दुर्गासिंग पावरा (वय ४९ रा़ गवळे नगर, देवपूर) हे नेहमी प्रमाणे शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शाळेत आले़ दुपारी १़१५ वाजेच्या सुमारास मुख्याध्यापक कार्यालयात दैनंदीन काम करत असतांना उदय अशोक शिरसाठ व त्याच्या बरोबर शशिकांत परशुराम साखरे दोघे कार्यालयात आले़ उदय हा मद्यधुंद अवस्थेत होता़
त्याने माझी मुलगी सकाळच्या सत्रात इयत्ता चवथीच्या वर्गात शिक्षण घेत आहे़ व तिचे तुमच्या विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेतले असलेले काही विद्यार्थी तिची छेड काढतात असे सांगुन शिवीगाळ व दमदाटी केली़ तसेच चपलाने मुख्याध्यापक पावरा यांना डोक्यावर मारहाण केली़ त्यांनी उदय सोबत असलेल्या इसमाने त्याला सरांना मारहाण करून नको, मी या शाळेत शिकलो आहे, असे म्हणाला़ त्यानंतर उदय याने टेबलावरील कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकुन दिली़
आरडा-ओरड ऐकुण शाळेतील वर्गातील शिक्षक किरण साळुंके, मनोजकुमार सुर्यंवशी, सुरेश कोकणी, मगन भामरे, राजेश सुर्यवंशी, मुग्धा रेंभोटकर, चैताली देसले , रतीलाल पावरा व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी धावुन आले़ त्यानी मध्यस्थीकरत भांडण मिटविले़ त्यानंतर शाळेचे पर्यवेक्षक अमोद जोग यांनी देवपूर पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली़ त्यानंतर मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला़ दरम्यान या घटनेनंतर दुपारून शाळेचे कामकाज बंद ठेवण्यात आले़
पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने
घटनेनंतर शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत दुपारी देवपूर पोलीस ठाणे गाठले़ तेथे तक्रार दाखल करून मारहाण करणाऱ्यास अटक करण्याची मागणी केली़ यावेळी काही विद्यार्थींही उपस्थित होते़ मारहाण करणारा कुटंूबासह हजर मुख्याध्यापक पावरा यांना मारहाण करणारा उदय शिरसाठ हा दुपारी कुटूंबियांसह स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला़ त्याच्यासोबत परिसरातील नागरिकही आलेले होते़
जिल्हा प्रशासनाला निवेदन
दरम्यान या घटनेनंतर धुळे एज्युकेशन सोसायटी व राज्य शिक्षक परिषदेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना सायंकाळी निवेदन सादर करण्यात आले़ गेल्या आठ दिवसांपासून सदरची व्यक्ती शालेय कामकाजात हस्तक्षेप करीत असून संबंधित व्यक्तीने केलेल्या तक्रारीनुसार ज्या विद्यार्थ्यांबद्दल त्यांची तक्रार होती त्यांना बोलावून समज देण्यात आली तसेच त्यांचे लेखी देखील घेण्यात आले़ तरी देखील सदर व्यक्ती सातत्याने धमकावत होती असे निवेदनात नमुद आहे़
शाळेला परिसरातील काही विध्वंसक नागरिकांचा नेहमीच त्रास असतो़ त्यामुळे डॉक्टरांप्रमाणेच शिक्षक संरक्षण कायदा पारित करावा, शाळेला पोलीस संरक्षण मिळावे व मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या़ निवेदन देतांना महिला कर्मचारी अत्यंत भावनिक झाल्या होत्या़ यावेळी चितळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व फिर्यादी अनारसिंग पावरा यांच्यासह संजय पवार, सी़ वाय अहिरराव, सी़आऱदेसले, एम़एस़तेले, एस़आऱदेशमुख, डी़टी़ठाकूर, रविंद्र टाकणे, नितीन ठाकूर, किशोर पाटील, आऱव्ही़पाटील, विजय बोरसे, के़बी़नांद्रे, एस़बी़सुर्यवंशी, एच़एऩठाकरे, विजयकुमार ढोबळे, एऩएम़जोशी, एस़पी़वाघ व शिक्षक, शिक्षिका वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते़