माढ्यात आणखी एक ट्विस्ट, धैर्यशील मोहिते पाटलांना धक्का; अनिकेत देशमुख अपक्ष लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 04:21 PM2024-04-18T16:21:12+5:302024-04-18T16:21:34+5:30
Madha loksabha Election - निवडणुकीची घोषणा झाल्यापासून माढा मतदारसंघ सातत्याने चर्चेत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज होत भाजपाबाहेर पडले. आता याचठिकाणी शेकाप नाराज झाली असून त्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे.
सांगोला - Aniket Deshmukh upset ( Marathi News ) येत्या लोकसभा निवडणुकीनिमित्त महायुती असो वा महाविकास आघाडी यांच्यात उमेदवारांची चाचपणी करताना कुठे बंडखोरी तर कुठे नाराजी दिसून येत आहे. अशातच सर्वाधिक चर्चेत असलेला माढा मतदारसंघात आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. याठिकाणी शेकापचे अनिकेत देशमुख यांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करत अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत.
याबाबत अनिकेत देशमुख म्हणाले की, चर्चेला आम्ही पाठिंबा दिला हे म्हणणं योग्य राहणार नाही. आम्ही दुधखुळे नाहीत. माढा मतदारसंघातील या सर्व घडामोडीत आमचा वापर करण्यात आला असं माझी स्पष्ट भूमिका आहे. प्रत्येकवेळी एकंदरित सगळ्यांना अंधारात ठेवून या गोष्टी घडल्या आहेत. हा आमच्यासाठी राजकारणातील धडा आहे. यापुढे अशी चूक होणार नाहीत असं त्यांनी सांगितले.
तसेच महाविकास आघाडीत असल्याने आम्हाला तुमच्याबद्दल चर्चा करायची आहे असं सांगितले, तेव्हा आम्ही माढ्यातील बैठकीला गेलो. त्या चर्चेत आम्हाला सांगितले एक आणि बैठकीत दुसरेच ठरले. त्यामुळे आता कार्यकर्त्यांशी बोलून चर्चा करून सर्वांचं एकमत झाल्यास उद्या सकाळी आम्ही अर्ज भरणार असल्याचंही अनिकेत देशमुख यांनी म्हटलं.
कोण आहेत अनिकेत देशमुख?
दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू असलेले अनिकेत देशमुख हे शेकापचे युवा नेते आहेत. २०१९ च्या सांगोला विधानसभेतून अनिकेत यांचा अवघ्या ७०० मतांनी पराभव झाला होता. मात्र या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून अनिकेत देशमुख यांच्या उमेदवारीची मागणी होत होती. सांगोला विधानसभेत गणपतराव देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग आहे. माढा मतदारसंघ आपल्याला सोडावा अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनीही केली होती. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाने भाजपातून धैर्यशील मोहिते पाटलांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.