भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का; धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांना भेटले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 04:16 PM2024-04-11T16:16:06+5:302024-04-11T16:16:33+5:30
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माढा मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. याठिकाणी नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली.
पुणे - Dhairyasheel Mohite Patil Meet Sharad Pawar ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यातील गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर मोहिते पाटलांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील प्रवेश निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता कायम आहे. ही जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे असल्याने मागील काही दिवसांपासून अनेक नावांवर चाचपणी करण्यात आली. धैर्यशील मोहिते पाटील हे रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यापासून नाराज होते. मोहिते पाटील समर्थकांनी अकलूजमध्ये बैठक घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते. तेव्हापासून मोहिते पाटील हे पवारांसोबत जातील अशी चर्चा होती. त्यानंतर आज प्रत्यक्षात पुण्यात ही भेट झाली. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाची मोठी डोकेदुखी होणार आहे. १३ एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील हे अकलूज इथं शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून हातात तुतारी घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे.
माढा मतदारसंघात भाजपाने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन प्रचारात आघाडी घेतली. पण, मोहिते पाटील यांच्याकडून निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध झाला. त्यातूनच भाजपाचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांनी वेगळा मार्ग शोधण्यास सुरू केले. केवळ धैर्यशील मोहिते पाटीलच नव्हे तर महायुतीतीलच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रामराजे नाईक-निंबाळकर हेही नाराज आहेत. यामुळे माढ्यात वेगळंच राजकारण रंगू लागलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यातील घडामोडींकडे शरद पवार हेही लक्ष ठेवून होते. त्यांनाही या मतदारसंघात तगड्या उमेदवाराची गरज आहे. त्यात अकलूजच्या मोहिते-पाटील घरातूनच उमेदवार गळाला लागल्यानं माढामध्ये भाजपासमोर तगडं आव्हान निर्माण झालं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी युतीतील नाराज मोहिते-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. पण, त्यातून पुढे काहीच झाले नव्हते, परंतु ही भेट घडविण्यामागे शरद पवार हेच असल्याची माहितीही समोर येत होती.