'हा चर्चेचा विषय नाही'; महायुतीला पाठिंबा दिलेल्या अभिजित पाटलांच्या साखर कारखान्यावर कारवाई टळली!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 11:52 AM2024-05-03T11:52:54+5:302024-05-03T12:03:12+5:30
पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली आहे.
Madha Loksabha Election : माढा लोकसभा मतदारसंघात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याने मोठा ट्विस्ट तयार झालाय. शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अभिजीत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर अभिजीत पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचा पाठिंबा काढून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मदत करण्याचे जाहीर केलं होतं. त्यानंतर आता अभिजीत पाटील यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्याला जप्तीच्या कारवाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. ४४२ कोटी थकवल्याप्रकरणी कारखान्याचे गोदाम सील करण्यात आले होते. मात्र आता कारवाईतून दिलासा मिळताच गोदामाचे सील काढले जाणार आहे.
पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने कारवाई केली. कारखान्याची तीन गोदामे बँकेने सील केली होती. राज्य शिखर बँकेकडून विठ्ठल सहकारी कारखान्याने कर्ज घेतले होते. मात्र कर्जाची परतफेड न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी अभिजीत पाटील हे शरद पवार गटात होते. त्यामुळे ते सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात सक्रिय होते. कारखान्यावरील बँकेने जप्तीची कारवाई केल्यानंतर पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत महायुतीच्या उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आता कारखान्यावरील मोठी कारवाई टळली आहे.
अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्याची तीन गोदामे थकबाकीमुळे सील केली होती. त्यामध्ये सुमारे १४ हजार क्विंटल साखर गोदामात अडकून पडली होती. मात्र या कारवाईतून मोठा दिलासा मिळाल्यामुळे तिन्ही गोदामांचे सील काढण्यात येणार आहे. ही कारवाई बेकायदा आणि लहरीपणाची असल्याची टिप्पणी करत कारखान्याची गोदामे सीलमुक्त करून पाच मेपर्यंत त्यांचा ताबा पुन्हा कारखान्याकडे देण्याचे आदेश पुण्याच्या कर्ज वसुली लवादाने दिले.
"कारखान्याच्या जुन्या संचालक मंडळाने कर्ज थकवले होते. २०२१ पासून कारवाई सुरु होती. शासनाने आम्हाला मदत केल्यामुळे बँकेने कोर्टात सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे न्यायालयाने गोडाऊनला लावलेले कुलूप उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजकीय वर्तुळातील चर्चेचा हा विषय नाही. २०२१ पासून ही कारवाई सुरु होती. सरकारला विनंती केल्यानंतर त्यांनी मला दिलासा दिला. साखर कारखाना सुरु राहिला पाहिजे हा महत्त्वाचा विषय होता. टीका टिप्पण्या होत राहतील पण सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कारखाना महत्त्वाचा आहे हे ठरवण्यात आलं," असं अभिजीत पाटील यांनी म्हटलं आहे.
कारखाना वाचत असेल तर मी कुठेही जायला तयार - अभिजीत पाटील
"कारखान्याचं सील काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. साहजिकच या मोबदल्यात त्यांचीही काहीतरी अपेक्षा असेल. ते आपल्याला आऊट ऑफ द वे जाऊन मदत करत आहेत, मग आम्हीही त्यांची मदत करणे, ही स्वाभाविक अपेक्षा आहे. आज मी त्यांना शेतकरी सभासदांसाठी जे करायची गरज आहे, ते करायची तयारी आहे. भाजपला पाठिंब्याचा निर्णय जाहीर करताना मी माझी स्वतःची राजकीय महत्वकांक्षा बाजूला ठेवून विठ्ठल कारखान्याच्या सभासदांच्या हिताचा निर्णय घेत आहे," असे अभिजीत पाटील यांनी म्हटलं होतं.