म्हैसाळ गर्भपात केंद्राचे माधवनगर ‘कनेक्शन’
By Admin | Published: March 7, 2017 11:15 PM2017-03-07T23:15:03+5:302017-03-07T23:48:21+5:30
औषधांचा पुरवठा : सोमवार पेठेतील गोदामावर छापा; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या गर्भपात केंद्राचे माधवनगर (ता. मिरज) ‘कनेक्शन’ असल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी उघडकीस आली. माधवनगरमधील एका व्यापाऱ्याने गर्भपात करण्यासाठी खिद्रापुरेच्या रुग्णालयात औषधांचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने मंगळवारी रात्री उशिरा या व्यापाऱ्याच्या गोदामावर छापा टाकला. मध्यरात्रीपर्यंत पोलिसांची मदत घेऊन गोदामाची तपासणी सुरु होती.
यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कारवाई सुरु आहे. ती पूर्ण झाल्याशिवाय माहिती देता येणार नाही, असे सांगून अधिक बोलण्याचे टाळले. माधवनगरचा हा व्यापारी औषधांची होलसेल विक्री करतो. गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधी गोळ्या व इंजेक्शनचा त्याने पुरवठा केल्याचे अटकेत असलेल्या खिद्रापुरेच्या चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर तातडीने व्यापाऱ्याच्या सोमवार पेठेतील गोदामावर छापा टाकला. मोठ्या प्रमाणात औषध व इंजेक्शन साठा हाती लागला असल्याचे समजते. व्यापाऱ्याचे साखर कारखाना परिसरात औषध दुकानही आहे. या व्यापाऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे.
म्हैसाळ येथे खिद्रापुरेचे गर्भपात केंद्र असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिस व वैद्यकीय पथकाने संयुक्तपणे सोमवारी त्याच्या रुग्णालयावर छापा टाकला होता. या छाप्यात गर्भपात करण्यास लागणाऱ्या औषधी गोळ्या व इंजेक्शन सापडली होती. ही औषधे महागडी आहेत. ती सांगली जिल्ह्यातून पुरविली असावीत, असा पोलिसांना संशय होता. त्याद्दष्टीने तपास सुरु ठेवला होता. तोपर्यंत फरारी असलेला खिद्रापुरे सोमवारी रात्री पोलिसांना शरण आला. त्यामुळे औषधांचा पुरवठा कोठून झाला, याचा तपास करण्यास गती मिळाली. मावधनगर येथे व्यापाऱ्याच्या गोदामावर छापा टाकल्याचे वृत्त पसरताच सोमवार पेठेत गर्दी होती. (प्रतिनिधी)
आरोग्यमंत्री आज म्हैसाळमध्ये
सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत बुधवारी सांगली दौऱ्यावर आहेत. सकाळी दहा वाजता ते म्हैसाळ येथे डॉ. खिद्रापुरे याच्या रुग्णालयास भेट देऊन पाहणी करणार आहेत. तपासाची माहिती घेणार आहेत.