बालभारतीत भरली मधुशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2017 09:30 PM2017-01-27T21:30:03+5:302017-01-27T21:30:03+5:30
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यासाठी पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणाऱ्या बालभारतीमध्ये मधुशाळा भरल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि 27 : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यासाठी पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणाऱ्या बालभारतीमध्ये मधुशाळा भरल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बालभारतीच्या इमारतीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मद्य पार्टी केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी एका अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यानी दिलीे.
बालभारतीच्या स्थापनेला शुक्रवारी (दि.२७) पन्नास वर्ष पुर्ण झाली. त्यानिमित्त बालभारतीच्या आवारात २३ जानेवारीपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर मद्य पार्टीचा प्रकार २४ तारखेला सायंकाळी घडला आहे. त्यावेळी बालभारतीचे संचालक डॉ. सुनिल मगर सरल या संगणक प्रणालीचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांना याबाबत दुसऱ्या दिवशी माहिती मिळाली. हा प्रकार समोर आल्यामुळे संस्थेच्या पन्नाशीला गालबोट लागले आहे.
मद्य पार्टी झाल्याचे मान्य करीत डॉ. मगर म्हणाले, हा प्रकार २४ जानेवारीला सायंकाळी घडला आहे. एक अधिकारी मद्य पिऊन गेस्ट हाऊसमधील रुमबाहेरील जागेतच पडला होता. चौकशीमध्ये हा अधिक्षक स्तरावरील अधिकारी असल्याचे पुढे आले आहे. सध्या एकाच अधिकाऱ्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये आणखी कोण अधिकारी व कर्मचारी सहभागी होते का, याबाबत चौकशी सुरू आहे.
प्राथमिक माहितीत जो अधिकारी दोषी आढळला आहे, त्याला शनिवारी सकाळपर्यंत निलंबित करून विभागीय चौकशी केली जाईल. तसेच यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. तसेच गेस्ट हाऊससाठी एका अधिकाऱ्याची स्वतंत्रपणे नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती डॉ. मगर यांनी दिली. दरम्यान, बालभारतीमध्ये यापुर्वीही अनेकदा मद्यपार्ट्या झाल्याची चर्चा सुरू आहे. गेस्ट हाऊसमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पार्ट्या रंगतात. याकडे लक्ष वेधले असता डॉ. मगर यांनी माहिती घेणार असल्याचे सांगितले.