महाराष्ट्रातील गावांना मध्य प्रदेशातून वीज
By admin | Published: January 11, 2015 12:46 AM2015-01-11T00:46:00+5:302015-01-11T00:46:00+5:30
महाराष्ट्रातील दोन गावांना मध्य प्रदेशातून वीज पुरवठा केला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील घाटपेंढरी व घाटकुपडा ही ती दोन गावे आहेत. पेंच वन क्षेत्रात नवेगाव खैरीजवळ ही गावे आहेत.
दोन गावांसाठी विशेष व्यवस्था : सहा रुपये खर्च, साडेतीन रुपये वसुली
कमल शर्मा - नागपूर
महाराष्ट्रातील दोन गावांना मध्य प्रदेशातून वीज पुरवठा केला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील घाटपेंढरी व घाटकुपडा ही ती दोन गावे आहेत. पेंच वन क्षेत्रात नवेगाव खैरीजवळ ही गावे आहेत. या दोन्ही गावात वीज पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही गावांनी पुढाकार घेत एक नवी व्यवस्था लागू केली आहे. या अंतर्गत मध्य प्रदेशने येथे लाईन टाकली तर बिल वितरित करण्यापासून ते वसूल करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर आहे.
लोकमत चमूने शुक्रवारी घाटपेंढरी या गावाला भेट देऊन पाहणी केली. घाटपेंढरी हे एक लहान पण स्वच्छ गाव आहे. सुमारे दोनशे घरे व दीड हजार लोकसंख्या आहे. गावातील बहुतांश लोक पाच-सहा किलोमीटरवर असलेल्या आपल्या शेतात कामासाठी गेले होते. गावात कमालीची शांतता होती. एका घरी चौकशी केली असता महिला टीव्ही पाहत असल्याचे दिसले. डिश टीव्ही लागल्यामुळे या गावातही सर्व चॅनेल दिसू लागले आहेत. या वेळी गावचे लाईनमेन शेख रफिक नूर मोहम्मद यांची भेट झाली. ते कोराडी येथे राहतात. मात्र गावात ड्युटी असल्यामुळे १९९८ पासून येथेच वास्तव्यास आहेत. त्यांनी सांगितले की, या दोन गावात १९९६ मध्ये वीज आली. गावाच्या सीमेवर ट्रान्सफॉर्मर लागला आहे.
मध्य प्रदेशातील वीज वितरण कंपनी इथवर वीज पोहचवते. या ट्रान्सफॉर्मरवर मध्य प्रदेशने एक मीटर लावले आहे. महाराष्ट्रातील वीज वितरण कंपनीने देखील येथे मीटर लावले आहे.
महावितरणने विजेचे खांब उभारून प्रत्येक घरी वीज पोहचवली आहे. या गावाला वीज पुरवठा करणे हा महाराष्ट्र सरकारसाठी फायद्याचा विषय नाही. महावितरणचे अधीक्षक अभियंता अरविंद भादीकर यांच्यानुसार या गावांमध्ये वापरण्यात येणाऱ्या विजेसाठी प्रति युनिट सहा रुपये मध्य प्रदेश सरकारला द्यावे लागतात. मात्र, संबंधित गावांकडून प्रति युनिट ३.५० रुपये दराने वसुली केली जाते. प्रत्येक युनिटवर अडीच रुपयांचा तोटा सहन केला जातो.
लाईनमेनच सर्वकाही
संबंधित दोन्ही गावांसाठी महावितरणने शेख रफिक यांना लाईनमेन नियुक्त केले आहे. गावचे लोक त्यांनाच कंपनी मानतात. दरमहा येणारे बिलही गावकरी त्यांच्याकडेच जमा करतात. लाईनमेन नवेगांव येथे येऊन पैसे जमा करतात व पावती गावकऱ्यांना देतात. वीज पुरवठा खंडित झाला तर रफिक यांना १० किलोमीटरवर असलेल्या मध्य प्रदेशच्या सबस्टेशनला कळवावे लागते. त्यानंतर मध्य प्रदेशचे अभियंता वीजपुरवठा सुरू करतात.
वीज पुरवठा करणे कठीण
कार्यकारी अभियंता सुहार म्हेत्रे व उप कार्यकारी अभियंता राजपाल गेडाम यांनी सांगितले की, या दोन गावांना महाराष्ट्रातून वीज पुरवठा करणे कठीण आहे. महाराष्ट्रातून वीज पुरवठा करावयाचा झाल्यास जंगलात सुमारे २० किलोमीटर लाईन टाकावी लागेल. तांत्रिक बिघाड आला तर दुरुस्ती करणे कठीण जाईल. त्यामुळे मध्य प्रदेशातून वीज घेणे हाच उत्तम पर्याय आहे.