मद्रास बटालियन विजेता

By admin | Published: March 11, 2017 12:13 AM2017-03-11T00:13:59+5:302017-03-11T00:13:59+5:30

सदर्न कमांड इंटर बटालियन फुटबॉल : १०८ टीए महार संघावर ३-१ ने मात

Madras battalion champion | मद्रास बटालियन विजेता

मद्रास बटालियन विजेता

Next

कोल्हापूर : सदर्न कमांड इंटर बटालियन फुटबॉल स्पर्धेच्या शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात १२२ इन्फंट्री बटालियन मद्रास संघाने १०८ इन्फंट्री बटालियन महार (एमपी) संघावर ३-१ अशी मात करीत विजेतेपद पटकावले. मद्रास संघाचा महंमद सुहेल चाहील हा उत्कृष्ट खेळाडू ठरला.
शाहू स्टेडियम येथे शुक्रवारी सकाळी १२२ टीएम मद्रास व १०८ टीए महार या दोन संघांत अंतिम सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांकडून वेगवान चाली खेळण्यात आल्या. ‘मद्रास’कडून फैजल, श्रीजित, चिको, महंमद सुहेल यांनी, तर महार संघाकडून विक्रम, गयासुद्दीन, प्रशांत, कीर्ती टी. यांनी उत्कृष्ट खेळ करीत उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळविली. पूर्वार्धापर्यंत दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळाचे प्रदर्शन झाले. मात्र, एकाही संघाला आघाडी घेता आली नाही.
उत्तरार्धात ४५ व्या मिनिटाला १०८ टीएम महार संघाच्या अर्जुनने गोल करीत संघाचे खाते उघडले. यानंतर मात्र, मद्रास संघाच्या शिबीन याने ५० व्या मिनिटाला उत्कृष्ट गोल नोंदवित सामना १-१ असा बरोबरीत आणला. यानंतर मद्रास संघाकडून संपूर्ण सामन्यावर शेवटपर्यंत वर्चस्व राहिले. मद्रासकडून ७५ व्या मिनिटाला अब्दुल रहिमानने, तर ७८ व्या मिनिटाला सुमेंशकडून गोल नोंदविण्यात आले. त्यामुळे सामन्यात ३-१ अशी मद्रास संघाची भक्कम स्थिती झाली. अखेरपर्यंत हीच गोलसंख्या कायम राखत मद्रास संघाने सामन्याबरोबर चषकावर नाव कोरले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ सदर्न कमांड हेडक्वार्टरचे डेप्युटी कमांडर कर्नल नवीन शर्मा, १०९ टीए मराठा बटालियनचे कमांडिंग कर्नल आर. एस. लेहल (सेना मेडल) यांच्या हस्ते झाले.
यावेळी मेजर नवीन पवार, लेफ्टनंट कर्नल संदीप भटनागर, लेफ्टनंट लियान वायफाय, सुभेदार उत्तम नाईक, शिवाजी पाटील, केएसएचे पदाधिकारी माणिक मंडलिक, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


चाहील सर्वोत्कृष्ट खेळाडू
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून १२२ मद्रास संघाचा महंमद सुहेल चाहील याला चषक देऊन गौरविण्यात आले. त्याने स्पर्धेत सर्वाधिक १० गोलची नोंद केली; तर उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून १५४ टीए बिहार संघाचा सॅम्युएल यास गौरविण्यात आले.
जाफरची हॅट्ट्रिक
अंतिम सामन्यापूर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी ११० टीए मद्र्रास विरुद्ध १५४ टी. ए. बिहार यांच्यात सामना झाला. तो मद्रास संघाने ५-० असा दणदणीत जिंकत तिसरा क्रमांक पटकाविला. या सामन्यात मद्रासच्या जाफरने हॅट्ट्रिकसह चार गोलची नोंद केली. हे गोल त्याने ४८, ८५, ८६, ९१ या मिनिटाला केले. उस्मानने ७४ मिनिटाला एक गोल केला.


५कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या सदर्न कमांड इंटर बटालियन फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या १२२ इन्फंट्री बटालियन मद्रास संघास विजेतेपदाचा चषक कर्नल नवीन शर्मा, कर्नल आर. एस. लेहल (सेना मेडल) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मेजर नवीन पवार, लेफ्टनंट कर्नल संदीप भटनागर, लेफ्टनंट लियान वायफाय, सुभेदार उत्तम नाईक, शिवाजी पाटील, के. एस .ए.चे पदाधिकारी माणिक मंडलिक, आदी उपस्थित होते.

Web Title: Madras battalion champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.