बाबा रामदेव यांच्या नूडल्ससाठी मॅगी हद्दपार - राष्ट्रवादीचा आरोप
By admin | Published: November 16, 2015 02:48 PM2015-11-16T14:48:00+5:302015-11-16T14:48:00+5:30
बाबा रामदेव यांच्या आटा नूडल्ससाठी मॅगीवर गदा आणली जात आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - बाबा रामदेव यांच्या आटा नूडल्ससाठी मॅगीला हद्दपार केले जात आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. गिरीश बापट यांनी बाबा रामदेव यांची एजंटगिरी बंद करावी अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.
बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेची आटा नूडल्स आज बाजारपेठेत दाखल झाली आहे. या क्षेत्रातील विदेशी कंपन्यांची एकाधिकारशाही मोडून निघेल असा विश्वास बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे. आटा नूडल्सच्या माध्यमातून मॅगीला आव्हान देण्याचा प्रयत्न पतंजलीने केला आहे. मात्र आता यावरुन राजकीय आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मॅगीसंदर्भातील सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हच उपस्थित केले आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार मॅगीची तीन प्रयोगशाळांमध्ये तपासणी झाली आहे, मग तरीदेखील गिरीश बापट मॅगीविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असे सांगतात. बापट यांच्यावर रामदेव बाबांचा दबाव आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.